कोरोना चाचणी ६२ जणांची, मात्र अहवालाच्या रिपोर्टचा बारकोड फक्त दोघांच्याच नावे ! - corona test of sixty two people but the barcode of the report in only the name of two | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना चाचणी ६२ जणांची, मात्र अहवालाच्या रिपोर्टचा बारकोड फक्त दोघांच्याच नावे !

उत्तम कुटे
शनिवार, 1 मे 2021

कंपनीने हे अहवाल दिलेल्या कोथरुड, पुणे येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि. कडे विचारणा केली. त्यावर त्यांनी असे रिपोर्टच आपण दिले नसल्याचे सांगितले. तसेच चिखलीच्या समर्थ लॅबकडून एकही नमुना तपासणीसाठी आला नसल्याचे स्पष्ट केले.

पिंपरी : कोरोना चाचणीचे (आरटी-पीसीआर) बनावट अहवाल देणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (महाळूंगे पोलिस चौकी) अटक केली असून त्यांना न्यायालयाने आज चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या टोळीने कोरोना असल्याचा बनावट रिपोर्ट दिल्याने तीन कामगारांना कोरोनावरील औषधे नाहक खाण्याची पाळी आली. त्यातून त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. तर, कोरोना नाही, असा अहवाल दिलेले ५९ कामगार हा आजार असण्याच्या शक्यतेमुळे धास्तावून गेलेले आहेत. 

एमआयडीसीतील कित्येक कामगारांना या त्रिकुटाने असे खोटे रिपोर्ट देऊन त्यांची फसवणूक केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. बिरुदेव नानासाहेब वाघमोडे (वय २२), बळीराम बापू लोंढे (वय २४) आणि सुरज चंद्रकांत शेळके (वय २१, तिघेही रा. चिखली, पिंपरी-चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेतील फसवणुकीच्या कलमांसह साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार काम करीत असलेल्या कंपनीची सतर्कता आणि पोलिसांची त्याला मिळालेली साथ यामुळे ही अनेकांचे जीव धोक्यास घालणारी बनावटगिरी व ती करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र त्यांनी अशाप्रकारे अनेकांना बोगस कोरोना रिपोर्ट दिला असल्याने त्यांपैकी काहींना त्याचा नक्की फटका बसला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

या टोळीने दिलेले ६२ कामगारांच्या कोरोना अहवालाचे बारकोड हे कामगारांच्या नावे नसून भलत्याच आणि फक्त दोन व्यक्तींच्याच नावे बनविल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. चिखलीत समर्थ पॅथ लॅबव्दारे या त्रिकुटाने भांबोली आणि महाळूंगे (ता. खेड, जि. पुणे) येथील इंप्रेशन्स सर्व्हिस प्रा. लि. या कंपनीच्या दोन प्लांटमधील ६२ कामगारांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेतले. त्याचा अहवाल दिला. त्यात ५९ कामगार हे निगेटिव्ह, तर तिघे पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेल्यांनी लगेच कोरोनाचे उपचार सुरू केले. दरम्यान, या कामगारांच्या कंपनीच्या व्यवस्थापनाने या रिपोर्टवरील बारकोड तपासले असता निगेटिव्ह अहवाल दिलेल्या ५९ जणांचे बारकोड हे शीतल लोंढे या एकाच व्यक्तीच्या नावे आढळले.तर पॉझिटिव्ह रिपोर्ट म्हणजे कोरोना असल्याचे सांगणाऱ्या तीन कामगारांचे बारकोड हे विशाल गोरे या दुसऱ्या एका व्यक्तीच्याच नावे असल्याचे दिसून आले. 

हेही वाचा : खंडणीप्रकरणी पुण्यातील गजा मारणे टोळीतील 13 जणांची कोठडी रवानगी 

त्यामुळे कंपनीने हे अहवाल दिलेल्या कोथरुड, पुणे येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि. कडे विचारणा केली. त्यावर त्यांनी असे रिपोर्टच आपण दिले नसल्याचे सांगितले. तसेच चिखलीच्या समर्थ लॅबकडून एकही नमुना तपासणीसाठी आला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर समर्थ लॅबमधून या कामगारांचे नमुने घेण्यासाठी आलेल्या आरोपींची पोलिसांनी धरपकड केली. दरम्यान, या बनावट रिपोर्टनुसार पॉझिटिव्ह आलेल्या कामगारांनी कोरोनावरील औषधोपचार सुरू केले होते. तर, निगेटिव्ह असलेल्यांना आपल्याला हा आजार झाला आहे की नाही, याची निश्चित माहिती न मिळाल्याने उपचाराअभावी त्यांचाही जीव धोक्यात आला होता. चाकण विभागाच्या साहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे आणि महाळूंगे चौकीचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, साहाय्यक निरीक्षक दत्तात्रेय गुळिंग व पथकाने ही कामगिरी केली.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख