जमीनी लाटण्याचा प्रयत्न फसला, म्हणून भाजप नेत्यांचा अजित पवारांवर आरोप.. - Attempt to loot land failed, so BJP leaders accuse Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

जमीनी लाटण्याचा प्रयत्न फसला, म्हणून भाजप नेत्यांचा अजित पवारांवर आरोप..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 मे 2021

पार्थ पवार यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे निव्वळ हास्यास्पद आहेत. पार्थ यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात वर्षभरापूर्वी झाली.

पिंपरी ः पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (PCNTDA) पीएमआरडीएमध्ये  (PMRDA) मध्ये विलिनिकरण करण्याच्या राज्य शासनाच्या  निर्णयामुळे काही भाजप नेत्यांचा प्राधिकरणाच्या जमिनी लाटण्याच्या प्रयत्नावर पाणी फेरले गेले.  (Yogesh Bahel refutes charges levelled againast Ajit Pawar) यातूनच ते उपमुख्यमंत्री अजित पवार  व त्यांचे पूत्र पार्थ यांच्यावर आरोप करून तोंडसुख घेत आहेत,असा असा प्रतिहल्ला राष्ट्रवादीचे नेते तथा ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केला.

राज्य मंत्रीमंडळाने नुकत्याच घेतलेल्या या निर्णय़ाचा निषेध करून त्यावर शहराचे कारभारी असलेले भाजपचे दोन्ही आमदार (भोसरीचे महेश लांडगे व चिंचवडचे लक्ष्मण जगताप) यांच्यासह पक्षाच्या महापौर माई ढोरे, सत्तारुढ नेते नामदेव ढाके व स्थायी समिती अध्यक्ष अॅड नितीन लांडगे हे तुटून पडले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अजितदादांना लक्ष्य केले. त्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष, पालिकेतील विरोधी पक्षनेते वा माजी आमदार असा कोणीही लगेच प्रतिवाद केला नव्हता व नाही.

मात्र, बहल यांनी भाजपचे आमदार व पालिका पदाधिकाऱ्यांना तोडीस तोड उत्तर देत या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडकरांचा फायदाच होणार असल्याचा दावा केला. हा विलिनिकरणाचा निर्णय तत्कालीन भाजप सरकारने तीन वर्षांपूर्वीच घेतला होता. फक्त काही कारणामुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यावेळी हा निर्णय किती योग्य आहे, याचे गोडवे गाणारे आता विरोध करत आहेत. म्हणजेच केवळ राजकीय हेतूने प्रेरित हे आरोप सुरू आहेत. जे लोक राजकीय जीवनात अजित पवारांच्या जिवावर मोठे झाले तेच आता आरोप करत आहेत ही खेदजनक बाब आहे, असा पलटवार बहल यांनी केला.

पालिकेमध्ये सध्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांनी भ्रष्ट कारभार करत सर्वसामान्य जनतेच्या पैशांची लूट चालविली आहे. मयताच्या टाळूवरील मलिदा खाणाऱ्या ठेकेदारांची बाजू घेणारे पक्षनेते नामदेव ढाकेंसारख्या व्यक्ती अजितदादांवर टीका करतात, यापेक्षा दुसरे दुर्देव काय असू शकते. स्वत:ची पापे लपविण्यासाठी आमच्या नेत्यांवर यापुढे आरोप केल्यास जशास तसेच उत्तर दिले जाईल. आम्हालाही खालची भाषा वापरात येते मात्र आमच्या नेत्यांची ती शिकवण नाही. मात्र,यापुढे त्यांनी बिनबुडाचे आरोप न थांबविल्यास त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा बहल यांनी दिला आहे.

भूलथापांना बळी पडू नका..

प्राधिकरणाच्या जागा बळकाविण्याचे काम आजपर्यंत जे करत आले आहेत त्यांच्या सांगण्यावरूनच हे आरोप होत आहेत. कोणताही अभ्यास न करता हे भाजपचे नेते केवळ आरोप करत सुटले आहेत, असा हल्लाबोल बहलांनी केला. हे तथ्यहिन आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या व लायकी नसलेल्या या नेत्यांना शहरातील जनता ओळखून आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

प्राधिकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या त्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला होता. अनेक शेतकऱ्यांना तो मिळाला आहे. ज्यांना तो मिळालेला नाही त्यांना तो  देण्यास महाविकास आघाडी सरकार बांधिल आहे. परताव्याची प्रक्रिया पुढेही कायम राहणार असून त्यामध्ये कोणताही खंड पडणार नाही. केवळ शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा व गैरसमज पसरविण्याचा प्रकार भाजपच्या मंडळींकडून सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने व शेतकऱ्यांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन बहल यांनी केले.

बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्राधिकरणाच्या एकूण १८५७ हेक्टर क्षेत्रापैकी विकसीत १६३३ हेक्टर इतके क्षेत्र पिंपरी महापालिकेकडे हस्तांतरीत होणार असून केवळ 223 हेक्टर क्षेत्र हे ‘पीएमआरडीए’कडे जाणार आहे. पालिकेकडे हस्तांतरीत होणाऱ्या जागेवर बांधकाम परवाना पालिकाच देणार आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न कायम राहणार असून प्रिमियमच्या माध्यमातूनही तिजोरीत भर पडणार आहे. हा पैसा शहर विकासासाठी उपयोगात येणार असल्यामुळे शहरवासियांचा फायदाच होणार आहे.

पार्थ पवार अपयशानंतरही मदतीसाठी पुढे

तसेच पार्थ पवार यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे निव्वळ हास्यास्पद आहेत. पार्थ यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात वर्षभरापूर्वी झाली. निवडणुकीत अपयश आल्यानंतरही ते पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना मदतीसाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत.राज्यात सत्तेत आल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे, साडेबारा टक्के परतावा व शास्तीकराचा निर्णय घेतला जाईल व हे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते.

मात्र दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार असतानाही हे प्रश्न त्यांनी सोडविले नाहीत. केवळ थापा मारून जनतेची मते मिळविणे आणि प्रश्न कायम ठेवण्याचे पाप या मंडळींनी केले आहे. जनता त्यांच्या या प्रकाराला वैतागल्याने जनमत घसरू लागले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना पराभव दिसू लागला आहे. या नैराश्येतून अजितदादा व पार्थ पवार यांच्यावर आरोप सुरू झाले आहेत.

राज्यात भाजपच्या सत्ताकाळात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ३० वर्षांपूर्वी झालेल्या साडेबारा टक्के परताव्याच्या निर्णयापोटी शेतकर्‍यांना आता जमिनी का द्यायच्या? अशी भूमिका घेत शेतकर्‍यांना परतावा देण्यास विरोध केला होता. त्यामुळे या निर्णय़ावरील भाजप नेत्यांचा कळवळा म्हणजे पुतणामाशीचे प्रेम असून ही केवळ नौटंकी आहे. असेही बहल यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्री घरात,अजितदादा पुण्यात पण गडकरींनी विदर्भाला सांभाळले

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख