मुंबई पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे कला दिग्दर्शक साप्तेंचा बळी.. - Art director Sapte's victim due to negligence of Mumbai police .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मुंबई पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे कला दिग्दर्शक साप्तेंचा बळी..

उत्तम कुटे
रविवार, 4 जुलै 2021

खासदार शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनीही याबाबत १८ डिसेंबर २०२० ला मुंबई पोलिसांना (पोलिस उपायुक्त परिमंडळ १२) पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती.

पिंपरी ः शनिवारी पहाटे पिंपरी-चिंचवडमधील ताथवडेमध्ये राहत्या घरी आत्महत्या केलेले कला दिग्दर्शक राजेश तथा राजू साप्ते यांनी त्यांच्या छळाविषयी व त्यांच्याकडून उकळण्यात येत असलेल्या खंडणीविषयी मुंबई पोलिसांत (दहिसर पोलिस ठाणे) अनेकदा तक्रार दिली होती. (Art director Sapte's victim due to negligence of Mumbai police)  त्याची वेळीच दखल घेत कारवाई केली असती, तर साप्तेंना आत्महत्या करावी लागली नसती, आज ते आपल्यात असते, अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी सोनालीसह नातेवाईकांनीही दिली आहे.

दरम्यान, साप्ते यांच्या आत्महत्येमुळे दर महिना शंभर कोटी रुपयांची हप्तावसूली, उद्योगपती मुकेश अंबानींच्या अॅंटिलिया निवासस्थाबाहेर उभी करण्यात आलेली स्फोटकाची मोटार आणि मनसुख हिरेनच्या मृत्यमुळे टीका होऊन अगोदरच अडचणीत आलेले मुंबई पोलिस आता पुन्हा टिकेचे झाले आहे. (Shivsena Mp Gajanan Kirtikar letter to Mumbai Police) यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीत चालणाऱ्या गुंडाराजसारखे मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी तथा फिल्मसिटीतील माफियाराजही समोर आले आहे.

या फिल्मसिटीतील ज्या फिल्म स्टुडिओ अॅन्ड अलाईड मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून साप्तेंनी जीव दिला, तेथील स्थानिक खासदार शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनीही याबाबत १८ डिसेंबर २०२० ला मुंबई पोलिसांना (पोलिस उपायुक्त परिमंडळ १२) पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. मात्र, खासदारांच्या या पत्रालाही मुंबई पोलिसांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यावर कारवाई झाली असती,तर साप्ते आज आपल्यात असते,अशी खंत किर्तिकर यांनीही आज `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केली.

ज्याच्या जाचामुळे साप्तेंनी आत्महत्या केली तो सदर युनियनचा खजिनदार राकेश मौर्या याच्या दादागिरी व मनमानीचा व त्याचा युनियन सदस्यांना होत असलेल्या छळवणुकीचा स्पष्ट उल्लेख  किर्तिकर यांनी डिसेंबरच्या आपल्या पत्रात केला होता. तर, साप्ते यांनीही आपल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सातपानी पत्रात (सुईसाईड नोट) मौर्या व त्याचे साथीदार नरेश विश्वकर्मा (मिस्त्री),गंगेश्वर श्रीवास्त व (संजूभाई) यांच्याकडून होत असलेल्या त्रासाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

पत्राची दखल घेतली असती तर..

आत्महत्येपूर्वी चित्रित केलेल्या एका व्हिडिओतूनही त्यांनी आपली ही कर्मकहाणी सांगितली आहे. हे पत्र आणि व्हिडिओ दोन्ही सरकारनामाच्या हाती लागले आहेत. या गुन्ह्यातील सर्व आरोपी परप्रांतीय आहेत. त्यांच्यावर तत्पर प्रतिबंधक कारवाई करा,असे किर्तिकर यांनी आपल्या पहिल्या पत्रात म्हटले होते. मात्र,फक्त पोच देण्याशिवाय काहीच केले गेले नाही. त्याचा परिणाम साप्तेंच्या आत्महत्येच्या रूपात समोर आला आहे.
असे अनेक साप्ते याअगोदर झालेत,असा संताप व्यक्त करून गेल्या सात-आठ वर्षापासून बॉलीवूडमध्ये हा नवीन वर्ग शिरला असल्याचे किर्तीकर म्हणाले.

युनियनच्या नावावर पैशाचा अपहार व शोषण सुरु आहे,असा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात न्यायालयातही धाव घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली .दरम्यान, कालच्या साप्तेंच्या आत्महत्येनंतर किर्तिकर यांनी पुन्हा परिमंडळ १२ च्या पोलिस उपायुक्तांना काल (ता.३) पुन्हा पत्र लिहून १८  डिसेंबर २०२० च्या आपल्या पत्राची आठवण करून दिली.  त्यावर वेळीच कारवाई झाली असती,तर साप्तेंना आत्महत्या करावी लागली नसती,असेही त्यांनी  म्हटले आहे. आता,तरी या प्रकरणी कारवाई करून सात दिवसांत मला कळवावे, असे त्यांनी स्थानिक पोलिस उपायुक्तांना बजावले आहे.

हे ही वाचा ः आम्ही जे पाच महिन्यात केले, ते या सरकारला अठरा महिन्यात जमले नाही..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख