मतदारयादीत नावच न आल्याने  खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदानापासून वंचित - MP Amol Kolhe's name absent from voter list | Politics Marathi News - Sarkarnama

मतदारयादीत नावच न आल्याने  खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदानापासून वंचित

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नावनोंदणी करूनही मतदारयादीत नाव न आल्याने खा.डॉ. अमोल कोल्हे यांना या निवडणुकीतील मतदानापासून आज वंचित रहावे लागले. दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरातील तीनपैकी फक्त भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे हेच या निवडणुकीसाठी मतदार असल्याने त्यांनी आपला हक्क सकाळीच बजावला.

पिंपरी : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नावनोंदणी करूनही मतदारयादीत नाव न आल्याने खा.डॉ. अमोल कोल्हे यांना या निवडणुकीतील मतदानापासून आज वंचित रहावे लागले.

पिंपरी-चिंचवडच्या दोन खासदारांत ते एकटेच  पदवीधर असल्याने मतदान करू शकणार होते. दुसरीकडे शहराच्या तीनपैकी फक्त भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे हेच या निवडणुकीसाठी मतदार असल्याने त्यांनी आपला हक्क सकाळीच बजावला. शहरातील बड्या राजकीय नेत्यांत या निवडणुकीत मतदान करणारे ते एकमेव ठरले आहेत.

पुणे पदवीधरसाठी नाव नोंदवूनही मतदारयादीत नाव न आल्याबद्दल खा.डॉ. कोल्हे यांच्या कार्यालयातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. इकडे त्यांचे विरोधक भोसरीचे आ.महेशदादा यांनी मतदानाचा हक्क त्यांचे विरोधक माजी आमदार विलास लांडे यांच्या लांडेवाडी,भोसरी येथील राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालयात असलेल्या मतदानकेंद्रात बजावला. त्यानंतर त्यांनी भाजपचाच उमेदवार शंभर टक्के विजयी होणार असल्याने  पुणे पदवीधर मतदारसंघात पक्षाच्या विजयाची हॅटट्रिक होणार असल्याचा आत्मविश्वास 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.

मतदारांत उत्साह असल्याने यावेळी मतदानाचा टक्का वाढेल,असेही ते म्हणाले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत शहरातील आमदार आणि खासदारांमध्ये एकमेव पदवीधर मतदार असलेले आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.माझे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या संकल्पनेला आहे,अशी प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर दिली. ही शाई नाही, तर भविष्य आहे. त्यामुळे पदविधरांनो आपले अमूल्य मत नोंदवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख