पालिकेच्या कोविड सेंटरची रेमडेसिवर काळ्या बाजारात?

हा प्रकार भाजपचेच नगरसेवक कुंदन गायकवाड आणि विजय डोळस यांच्यामुळे ३० एप्रिलला उघडकीस आला. त्यानंतर त्याच दिवसाच्या पालिका सभेत त्यावरून मोठा गदारोळ झाला. तर, दुसऱ्या दिवशी शहरात आलेले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या धक्कादायक प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते.
पालिकेच्या कोविड सेंटरची रेमडेसिवर काळ्या बाजारात?
A Brother of Covid Center arrested by Pimpari police in Blackmarketing of Remdesivir Injection

पिंपरी : पिंपरी महापालिकेचे (Pimpri Municipal Corporation) ॲटोक्लस्टर कोविड सेंटर चालविणाऱ्या फार्च्यून स्पर्श हेल्थकेअर (FORTUNE HEALHCARE PVT. LTD.) या रुग्णालयाच्या  अडचणीत आता आणखी वाढल्या आहेत. आयसीयू बेड मोफत असतानाही त्यासाठी एक लाख रुपये घेतल्याबद्दल या सेंटरमधील डॉक्टरला अगोदरच पोलिसांनी अटक केली आहे. तेथेच ब्रदर म्हणून काम करणाऱ्याला रेमडेसिवरच्या (Remdesivir Injection) काळाबाजारप्रकरणी पोलिसांनी काल अटक केली. (A Brother of Covid Center arrested by Pimpari policein Blackmarketing of Remdesivir Injection)

]बावीसशे रुपयाचे हे इंजेक्शन तो चाळीस हजार रुपयांना विकत होता. तो व त्याच्या दोन साथीदारांना दहा तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला.अजय बाबाराजे दराडे (वय १९, रा. पिंपरी) असे या स्पर्शच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नितीन हरिदास गुंड (वय २३) आणि
सागर काकासाहेब वाघमारे (दोघेही रा. विजयनगर,काळेवाडी,पिंपरी) या त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी पकडले आहे. बनावट गिर्हाईक पाठवून बावीसशेचे रेमडेसिवर चाळीस हजारांना रंगेहाथ विकताना या त्रिकूटाला पकडण्यात आले.

त्यांच्याकडून दोन रेमडेसिवर, तीन मोबाईल, एक हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. पिंपरी पोलिसांचा सामाजिक सुरक्षा विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली. काळेवाडी येथील डेंटर प्लॅनेट हॉस्पिटलसमोर सापळा लावून त्यांना पकडण्यात आले. दराडे हा कोविड सेंटरमधील रेमडेसिवरचा काळाबाजार करीत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना स्वतच याबाबत खबर मिळाली होती. त्यांनी झिरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत शहरातील अवैध धंद्याविरुद्ध माहिती देण्याकरिता नागरिकांसाठी आपला मोबाईल नंबर जाहीर केलेला आहे. 

त्यावरच हा रेमडेसिवरचा काळाबाजार चालत असल्याची माहिती मिळाली होती. स्पर्श ही अगोदरच मोठ्या प्रमाणावर बदनाम झालेली आहे. भोसरीतील दोन कोविड सेंटरमध्ये एकाही रुग्णावर उपचार न करता त्यांनी पालिकेकडून दोन कोटी १७ लाख रुपये गेल्यावर्षी उकळलेले आहेत. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येताच काळ्या यादीत टाकण्याची मागणी झालेल्या या संस्थेलाच पुन्हा अॅटोक्लस्टर कोविड सेंटर यावर्षी चालविण्याठी देण्यात आले. त्याबद्दल मोठे आश्चर्यही व्यक्त करण्यात आले होते. 

मात्र, पालिकेतील एका सत्ताधाऱी भाजपच्या नगरसेवकाचे त्यात लांगेबांधे असल्याने बदनाम झालेल्या स्पर्शला पालिकेने पुन्हा स्पर्श करून हे नवे कंत्राट दिल्याची चर्चा आहे. तेथे दाखल रुग्ण महिला मरण पावल्यावर त्यांचे मंगळसूत्र गहाळ झाल्याची तक्रार सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी दिलेली आहे. तर, गेल्या महिन्यात २४ तारखेला कोरोना झालेल्या पालिकेच्या मुख्याध्यापिकेला आयसीय़ू बेड देण्यासाठी याच सेंटरमधील एका डॉक्टरने एक लाख रुपये या मोफत बेडसाठी घेतले होते. या रुग्णाचा २८ एप्रिलला मृत्यू झाला. त्यांच्याही हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या त्यांचा मृतदेह नातेवाईकांकडे देताना हातात नसल्याचे आढळले होते. 

दरम्यान, हा प्रकार भाजपचेच नगरसेवक कुंदन गायकवाड आणि विजय डोळस यांच्यामुळे ३० एप्रिलला उघडकीस आला. त्यानंतर त्याच दिवसाच्या पालिका सभेत त्यावरून मोठा गदारोळ झाला. तर, दुसऱ्या दिवशी शहरात आलेले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या धक्कादायक प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी गुन्हा नोंदवून या सेंटरमधील डॉ. प्रवीण जाधवसह इतर तीन डॉक्टरांना अटक केली. त्यानंतर या कोविड सेंटरच्या डॉक्टरानंतर आता तेथील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याने ते चालविणाऱ्या स्पर्शचा ठेका आता रद्द होण्याचीच दाट शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in