प्राधिकरण वाचवायला एक व्हा; आमदार महेश लांडगेंची साद

शहरातील भूमिपुत्रांनी जमिनी दिल्यामुळेच प्राधिकरण स्थापन झाले आणि वाढले. आता प्राधिकरण विलीन झाल्यावर शहरातील संपत्ती, ठेवी पीएमआरडीएकडे वर्ग होणार आहेत. ही बाब शहराला परवडणारी नाही. त्यामुळे आपण सकारात्मक विचार करून पिंपरी- चिंचवडकर म्हणून एकोप्याने आणि सनदशीरपणे प्राधिकरण विलीनीकरण निर्णयाला विरोध करू या.
प्राधिकरण वाचवायला एक व्हा; आमदार महेश लांडगेंची साद
Be one to save Corporation; MLA Mahesh Landage's call

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (PCNTDA) वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी आपले राजकीय जोडे दूर ठेवून एकत्र येण्याचे
आवाहन भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी आज केले. प्राधिकरणाचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात(PMRDA) विलीनीकरण करण्याचा राज्य मंत्रीमंडळाने नुकताच घेतलेला निर्णय हा शहरावर अन्यायकारक असल्याने त्याविरोधात एकोप्याने लढू या, अशी साद त्यांनी घातली आहे. (MLA MAHESH LANDAGE APPEALED TO ALL POLITICAL PARTIES TO COME TOGETHER AGAINST DECESION OF STATE  CABINET TO AMALGAMATION OF PCNTDA IN PMRDA) 

या आवाहनाची पत्रे आमदार लांडगे यांनी शहरातील आमदार, माजी आमदार, महापौर, माजी महापौर, उपमहापौर, माजी उपमहापौर, सर्व
पक्षांचे नेते, पदाधिकारी, शहराध्यक्ष यासह सर्वपक्षीय नगरसेवक, गटनेते यांना आज पाठवली. त्यात त्यांनी पीएमआरडीएची आर्थिक मरगळ झटकण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच  पीएमआरडीएचा आवाका आणि व्याप पहाता ते पिंपरी-चिंचवडकरांना अपेक्षित असलेली विकासकामे गतीमानपणे करु शकणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. 

या पत्रात आ. लांडगे म्हणतात, पीएमआरडीएमध्ये प्राधिकरणाचे विलीनीकरण करुन शहराचे तुकडे करण्यापेक्षा आशिया खंडातील सर्वांधिक
श्रीमंत पिंपरी-चिंचवड या सक्षम पालिकेत ते वर्ग करणे अपेक्षित व योग्य होते. तत्कालीन भाजप सरकारने प्राधिकरण विलीनीकरणाचा प्रस्ताव आणला होता. त्यावेळी आपण सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी विरोधच केला होता. आता पुन्हा राजकीय मतभेद विसरुन पिंपरी-चिंचवडकर म्हणून आपण एकत्रितपणे प्राधिकरण विलीनीकरणाला विरोध केला पाहिजे. 

प्राधिकरणच्या सुमारे १ हजार २०० कोटी रुपयांच्या ठेवी आणि कोट्यवधी रुपयांचे मोकळे भूखंड आहेत. शहरातील भूमिपुत्रांनी जमिनी दिल्यामुळेच प्राधिकरण स्थापन झाले आणि वाढले. आता प्राधिकरण विलीन झाल्यावर शहरातील संपत्ती, ठेवी पीएमआरडीएकडे वर्ग होणार आहेत. ही बाब शहराला परवडणारी नाही. त्यामुळे आपण सकारात्मक विचार करून पिंपरी- चिंचवडकर म्हणून एकोप्याने आणि सनदशीरपणे प्राधिकरण विलीनीकरण निर्णयाला विरोध करू या. 

दरम्यान, प्राधिकरण विलिनीकरणाला शहरातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल यांनी समर्थन दिले आहे. तर, आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्राधिकरण विलिनीकरणाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. त्याबद्दल त्यांचे आमदार लांडगेंनी आभार मानले आहेत.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in