शिवसेनेचे नामदेवराव सहा दिवसांपूर्वी काॅंग्रेसमध्ये आणि सातव्या दिवशी राष्ट्रवादीत! - namdeorao bhagat left shivsena joins congress and in six days he is in NCP | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचे नामदेवराव सहा दिवसांपूर्वी काॅंग्रेसमध्ये आणि सातव्या दिवशी राष्ट्रवादीत!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

महाआघाडीत एकमेकांचे नेते न फोडण्याचे धोरण ठरलेले असताना रंगली राजकीय सर्कस

नवी मुंबई :  नवी मुंबईत महापालिकेचे राजकारण चांगलेच रंगात आले असून महाविकास आघाडीतील तीन पक्षांतच त्यासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे. काँग्रेसचे नेते नामदेवराव भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन मुंबई येथे हा पक्षप्रवेश झाला.

विशेष म्हणजे अगदी सात दिवसांपूर्वी भगत यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या आधी ते शिवसेनेत होते. महाविकास आघाडीतीन नेते, कार्यकर्ते फोडायचे नाहीत, असा अलिखित नियम ठरलेला असताना भगत मात्र हे तीनही पक्ष फिरून मोकळे झाले आहेत. त्यांच्या या राजकीय प्रवेशाचे काय पडसाद उमटणार, याची आता उत्सुकता आहे.

भगत हे माजी नगरसेवक आहेत. आगरी समाजात त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. तरी त्यांच्यासाठी आधी काॅंग्रेसने आणि आता राष्ट्रवादीने पायघड्या घातल्या. प्रवेश झाल्याझाल्या त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भगत यांनी काॅंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर ते शिवसेनेत गेले. तेथे त्यांना सिडकोवर काम करायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तेथे काहीच संधी न मिळाल्याने त्यांनी अखेरीस सात दिवसांपूर्वी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे त्यांना सिडकोचे पद देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाने नवी मुंबईत काॅंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. थेट नाना पटोलेंच्या विरोधातच तक्रारी करण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे भगत यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. तेथे त्यांचे मोठ्या नेत्यांनी स्वागत केले.

या वेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की  गणेश नाईक जरी पक्ष सोडून गेले तरी आदरणीय पवार साहेबांवर निष्ठा असणारे अनेक कार्यकर्ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. भगत यांच्या येण्याने पक्षाला नवी मुंबईत उभारी येईल.  अनेक लोक आज राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत मात्र कोरोनामुळे थांबले आहेत. पण येत्या काळात राष्ट्रवादी हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष असेल. राष्ट्रवादीत प्रेम, जिव्हाळा, विचार आहे आणि प्रत्येकाला महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे नामदेवराव भगत योग्य ठिकाणी आले आहेत.

अजित पवार म्हणाले की स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय पवार साहेब यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहोत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत आहोत. त्यामुळे अनेक जण प्रभावित होऊन राष्ट्रवादीत येऊ इच्छितात, या भावनेतूनच नामदेव भगत यांनी पक्षात प्रवेश केला. गणेश नाईक यांना नवी मुंबई आंदण दिल्यासारखे होते. पण गणेश नाईक भाजपची सत्ता येईल म्हणून भाजपवासी झाले. ते जरी भाजपमध्ये गेले असले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत आजही आहेत. भगत यांनी सामाजिक, राजकीय जीवनात प्रचंड काम केले आहे. लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. त्यामुळे नामदेव भगत यांच्या रुपाने एक खंदा कार्यकर्ता पक्षाला लाभला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची विचारपूस केली जाते, त्यांचा सन्मान ठेवला जातो म्हणून पक्षात प्रवेश केला. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पूर्ण करेन, असा विश्वास नामदेवराव भगत यांनी यावेळी व्यक्त केला. 

यावेळी अनिल गोटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख