गुलाबराव कशाला पाठ थोपटून घेता, निधीचे नियोजन होतच असते; आमदार भोळेंचा टोला - No matter what Gulabrao does, fundraising is always done | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

गुलाबराव कशाला पाठ थोपटून घेता, निधीचे नियोजन होतच असते; आमदार भोळेंचा टोला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

भाजपाचे माजी पालकमंत्री यांच्या कार्यकाळात दरवर्षी शंभर टक्के निधी खर्च झालेला आहे.

जळगाव : जळगाव महापालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप वाद आता आणखी वाढला आहे. भाजप आमदार सुरेश भोळे यानी थेट शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वरच टीकास्त्र सोडले. नियोजन निधी प्रत्येक जिल्ह्यात खर्च होत असतो, तुम्ही का पाठ थोपटून घेत आहात, असा टोला भोळे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला आहे.

जळगाव महापालिकेत भाजपकडून शिवसेनेने सत्ता हिसकावल्या नंतर दोन्ही पक्षात जोरदार शाब्दिक हल्ले सुरू आहेत. शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते व. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करतांना त्यांनी जळगावसाठी  काहीही केले नसल्याचे म्हटले होते. आपण जिल्हा नियोजन विभागातून महापालिकेसाठी ६० कोटी रुपये मंजूर केले असल्याचा दावाही त्यांनी केला.

यावर भाजप आमदार सुरेश भोळे यांनी गुलाबराव पाटलांवर पलटवार केला आहे.  भाजपचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील असताना त्यांनीही जिल्हा नियोजन समितीतून विकास निधी मंजूर केला होता. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा वार्षिक योजनेतून जळगाव जिल्हा अंतर्गत सन २०१६-१७ वितरीत तरतुदीशी खर्चाची एकूण टक्केवारी ९९.०४%, सन २०१७-१८ अंतर्गत ९९.८७%, सन २०१८-१९ अंतर्गत ९९.६६% इतकी होती, असा दावा भोळे यांनी केला.

भाजपाचे माजी पालकमंत्री यांच्या कार्यकाळात दरवर्षी शंभर टक्के निधी खर्च झालेला आहे. या निधीचे  संबंधित विभागाचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या नियंत्रणद्वारे नियोजन होतच असते. तसेच शासन स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात याच प्रकारे निधी खर्च होत असतो. तेव्हा गुलाबराव पाटील यांनी डीपीडीसी अंतर्गत होणाऱ्या विकास कामांचे श्रेय घेऊन स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये, असा चिमटा भोळे यांनी काढला.

Edited By : Jagdish Pansare
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख