भाजप सोडणाऱ्यांची दुकानदारी बंद होणार : गिरीश महाजनांचा खडसेंवर हल्लाबोल - girish mahajan criticizes eknath khadase in choda rally | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप सोडणाऱ्यांची दुकानदारी बंद होणार : गिरीश महाजनांचा खडसेंवर हल्लाबोल

कैलास शिंदे
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

एकनाथ खडसे पक्ष सोडून गेल्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे.

जळगाव : भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. नरेंद्र मोदी यांनीदेखील त्याग आणि मेहनतीच्या बळावर त्यांना पक्षाने पंतप्रधान पदावर बसवले आहे. भाजप हा एखाद्या व्यक्तीचा पक्ष नसून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्या संस्कारात कार्यकर्ते वाढले असल्याने कोणी जरी पक्ष सोडून गेले तरी आमदार - खासदार सोडा, भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता देखील पक्ष सोडणार नाही, असा विश्वास माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चोपडा येथील भाजपच्या  बैठकीत व्यक्त केला. 

एकनाथ खडसे पक्ष सोडून गेल्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपने तालुका स्तरावर बैठकांचा सपाटा लावला आहे. चोपड्यात मात्र भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून नेत्यांनी जोशात भाषणे केली. आजच्या बैठकीतून भाजप कार्यकर्त्याची ताकद भक्कम असल्याचे सिध्द झाल्याचे तसेच चोपडा हा भाजपचाच बालेकिल्ला कायम असल्याचे दिसून आले.

चोपडा तालुक्यात दोन जिल्हा परिषदेचे दोन सभापतीपद देवुन याआधिच पक्षाने बळ दिले आहे. भाजपतर्फे आज  पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने भाजपाचा बालेकिल्ला चोपड्यात आजही कायम दिसून आला.

बैठकीस पक्षाचे संघटनमंत्री विजयराव पुराणीक, गिरीश महाजन, संघटनमंत्री किशोर काळकर, खासदार रक्षा खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू भोळे आदी उपस्थित होते.

पक्ष वाढविण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी,प्रमोद महाजन गोपिनाथ मुंढे आदी नेत्यांनी खुप मेहनत घेतली आहे. एका विचार धारेवर पक्ष चालत आहे. मी आहे म्हणून पक्ष आहे. असे म्हणणारे आता इतिहासजमा झाले. आज जे भाजप सोडत आहेत त्यांची दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

 
विजय पुराणिक म्हणाले की, कोविडच्या काळात भाजपा कार्यकर्त्यांनी लोकाची सेवा करित आसतांना स्वतःचा जीव धोक्यात घालुन काम केले. भाजपाचे काम करण्याचा उद्देश हा सर्व सामान्य लोकांची सेवा करणे हाच आसला पाहिजे. असे विजय पुराणिक म्हणाले. केंद्र सरकारमध्ये असलेल्या मोदी सरकारने शेतकरी, महिलांसाठी विविध योजना आणल्यात ह्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात असेही त्यांनी आवाहन केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख