बारमालकाने गृहमंत्र्यांच्या घरासमोर का केला आत्मदहनाचा प्रयत्न ? - Why did the bar owner try to set himself on fire in front of the Home Minister's house? | Politics Marathi News - Sarkarnama

बारमालकाने गृहमंत्र्यांच्या घरासमोर का केला आत्मदहनाचा प्रयत्न ?

अनिल कांबळे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

मयूरने घरमालकीणीवर घरातील लॅपटॉप, पासपोर्ट आणि महत्त्वाच्या वस्तू ताब्यात घेतल्याचा आरोप केला. या प्रकारातून मयूर नैराश्‍यात गेला. त्याने शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास जीपीओ चौकातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराच्या काही अंतरावर अंगावर रॉकेल घेतले.

नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरासमोर शनिवारी दुपारी एका बारमालकाने अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगानधान राखून धाव घेत रॉकेलची डबकी त्याच्या हातातून हिसकावून घेतली आणि पुढील अनर्थ टळला. सीताबर्डी पोलिसांनी बारमालक जुनी वस्ती खामला निवासी मयूर सुरेंद्र जयस्वाल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घरमालकाशी घरभाड्याचा वाद आणि आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीसांनी दिली. 

सीताबर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर जयस्वाल याचा छोटा ताजबागमध्ये एम्पायर नावाने बार आहे. लॉकडाऊनपासून बार बंद आहे. यादरम्यान त्याची पत्नी माहेरी राहायला गेली. गेल्या तीन महिन्‍यांपासून तो खामल्यातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो. भाड्यावरून घरमालकीणीशी त्याचा वाद झाला. ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे मागत असल्याचा आरोप मयूरने केला आहे. घरमालकीणीशी वाद झाल्याने दोघांत भांडण झाले. वाद वाढल्याने दोघेही प्रतापनगर पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी एकमेकांची तक्रार ऐकून घेतली आणि कारवाई केली. घरमालकीणीने त्याच्या घराला स्वतःचे कुलूप लावले. 

मयूरने घरमालकीणीवर घरातील लॅपटॉप, पासपोर्ट आणि महत्त्वाच्या वस्तू ताब्यात घेतल्याचा आरोप केला. या प्रकारातून मयूर नैराश्‍यात गेला. त्याने शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास जीपीओ चौकातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराच्या काही अंतरावर अंगावर रॉकेल घेतले. स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिस कर्मचाऱ्यांना दिसला. पोलिसांनी लगेच धाव घेत मयूरला ताब्यात घेत त्याचे प्राण वाचवले. मयूर जयस्वालवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.   (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख