प्रसिद्धीसाठी हपापलेल्या ‘या’ पोलिसांवर कोण करणार कारवाई ? - who will take action against those policemen who are tempted by publicity | Politics Marathi News - Sarkarnama

प्रसिद्धीसाठी हपापलेल्या ‘या’ पोलिसांवर कोण करणार कारवाई ?

अनिल कांबळे
गुरुवार, 22 जुलै 2021

पोलिस विभागाला शिस्तप्रिय खाते म्हणून ओळखल्या जाते. शिस्तीचा भंग केल्यास पोलिस प्रशासन थेट कारवाईचा बडगा उगारते. तरीही राज्य पोलिस दलातील अनेक कर्मचारी खाकी वर्दी अंगात चढविल्यानंतर ‘सैराट’ झाल्यासारखे वागतात.

नागपूर : प्रसिद्धी मिळविणे काही गैर नाही. पण नियम तोडून जर ती मिळविली जात असेल, तर अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. राजकीय पुढारी सोशल मिडिया आणि फ्लेक्सच्या माध्यमांतून प्रसिद्धी घेताना दिसतात. पण पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी शासकीय शस्त्रासह सोशल मिडीयावर आणि फ्लेक्सवर आपले फोटो झळकवतात. पण नियमानुसार तसे करता येत नाही. त्यामुळे प्रसिद्धीच्या मोहात पडलेल्या अशा पोलिसांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडला आहे. Who will take action against those policemen who are tempted by publicity?

सर्वसामान्य नागरिकांनी जर शस्त्रासह असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यास तातडीने कारवाई केली जाते. पोलिसांनासुद्धा सोशल मीडियावर शासकीय शस्त्रासह फोटो टाकण्यास मनाई आहे. यानंतरही काही उत्साही पोलिस सेल्फी किंवा फोटो सोशल मीडियावर टाकून रुबाब दाखवतात. सामान्य लोकांना असे केले तर कारवाईचा बडगा उगारला जातो, पोलिसांना मात्र यातून सोयीस्करपणे सूट दिली की काय, असेही लोक बोलत आहेत.  

पोलिस विभागाला शिस्तप्रिय खाते म्हणून ओळखल्या जाते. शिस्तीचा भंग केल्यास पोलिस प्रशासन थेट कारवाईचा बडगा उगारते. तरीही राज्य पोलिस दलातील अनेक कर्मचारी खाकी वर्दी अंगात चढविल्यानंतर ‘सैराट’ झाल्यासारखे वागतात. पोलिस कर्मचारीच नव्हे तर अधिकाऱ्यांनासुद्धा सर्व्हिस रिव्हॉल्वरसह फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा मोह आवरत नाही. अनेक जण व्हॉट्सॲपच्या डीपीवर शासकीय पिस्तुलासह फोटो टाकतात. तसेच काही पोलिस कर्मचारी खाकी वर्दी आणि पिस्तुलासह फेसबुकवर प्रोफाइल फोटो ठेवतात. 

फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर स्टेटसमध्येही शासकीय शस्त्रांसह फोटो ठेवले जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो. केवळ दहशत किंवा परिसरातील नागरिकांवर वचक ठेवण्यासाठीच पोलिस कर्मचारी फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर शस्त्रासह फोटो ठेवत असल्याचे नागरिक बोलतात. पोलिस कर्मचाऱ्यांच्या अशा कृत्याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असते. शिस्तभंगाशिवाय अन्य कोणतीही कारवाई करीत होत नसल्यामुळेच असे प्रकार वाढत आहेत. 
 

वरिष्ठांनी घ्यावी दखल 
शहर पोलिस दलातील अनेक पोलिस कर्मचारी वाढदिवस किंवा घरातील अन्य कार्यक्रमाच्या दिवशी आपापल्या वस्तीत मोठमोठे फ्लेक्स लावून वर्दी आणि शासकीय शस्त्रासह फोटो छापतात. सोशल मीडियावर शस्त्रासह फोटो ठेवल्यास चमकोगिरी करण्याची संधी मिळते. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत. 

हेही वाचा : उत्साहाचा खळाळता झरा म्हणजे, आदरणीय अजित दादा…
 
पोलिस महासंचालक कार्यालयाकडून जे दिशानिर्देश दिलेले आहेत, त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यांनी पालन करणे बंधनकारक आहे. पोलिस खाते शिस्तप्रिय म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रत्येकाने शिस्त पाळणे अपेक्षित आहे. जर कुणी नियमांचे उल्लंघन करीत असेल तर नियमानुसार कारवाई होईल. 
- सुनील फुलारी (प्र, सहपोलिस आयुक्त)
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख