कोण राहणार भाजपचा पदवीधर मतदार संघाचा उमेदवार ? - who will be the bjps candidate for the graduate constituency | Politics Marathi News - Sarkarnama

कोण राहणार भाजपचा पदवीधर मतदार संघाचा उमेदवार ?

राजेश चरपे
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

संदीप जोशी यापूर्वीसुद्धा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. उमेदवार जाहीर होण्यापूर्वी मतदार नोंदणीची जबाबदारी भाजपने त्यांच्यावर सोपवली होती. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची ही जागा असल्याने पक्षाने उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार त्यांना सोपवले होते. मात्र आता राजकीय समीकरणे बदलली आहेत.

नागपूर : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून ॲड. अभिजीत वंजारी यांचे नाव जवळपास निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. पण भारतीय जनता पक्षाकडून मात्र अद्यापही घोषणा झालेली नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्यांमध्ये संभ्रम निर्णाण झाला आहे. आमदार अनिल सोले की संदीप जोशी, हाच प्रश्‍न सध्या चर्चिला जात आहे. दोघांचेही समर्थक भाऊंना उमेदवारी पक्की असल्यावर ठाम आहेत. आता प्रतिक्षा आहे ती अधिकृत घोषणेची. 

पदवीधर मतदार संघाचे आमदार अनिल सोले यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. ते दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता नव्या उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी भाजपचे युवा कार्यकर्ते करीत आहेत. दुसरीकडे महापौर संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यांना पक्षाने संकेत दिल्यानंतरच त्यांनी घोषणा केल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. कोरोनामुळे पदवीधरची निवडणूक लांबणीवर टाकली आहे. सध्या भाजपसह, काँग्रेस व काही अपक्ष उमेदवार कामाला लागले आहेत. मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली जात आहे. 

काँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अनिल सोले यांनी आपली चमू कामाला लावली आहे. दौरेही सुरू केले आहेत. त्यांचा प्रत्यक्ष गाठीभेटींवर जोर आहे. दुसरीकडे युवा मोर्चाने अलीकडे अनेक चौकांमध्ये पोस्टर लावणे सुरू केले आहे. मतदार नोंदणी करा आणि भाजपच्या उमेदवाराला निवडून आणा, असे आवाहन केले जात आहे. युवा मोर्चा यापूर्वी पदवीधरमध्ये फारसा सक्रिय दिसत नव्हता. त्यामुळे युवा नेत्याला प्रमोट करण्यासाठी मोर्चा कामाला लागल्याचे बोलले जात आहे. 

विशेष म्हणजे संदीप जोशी यापूर्वीसुद्धा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. उमेदवार जाहीर होण्यापूर्वी मतदार नोंदणीची जबाबदारी भाजपने त्यांच्यावर सोपवली होती. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची ही जागा असल्याने पक्षाने उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार त्यांना सोपवले होते. मात्र आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही मत यावेळी उमेदवार निवडताना महत्त्वाचे राहणार आहे.       (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख