आयसोलेशनमध्ये कोणता पक्ष जाईल, ते लवकरच कळेल..  

मी स्वतः आणि आमचे सहकारी मंत्री पूरग्रस्त भागांत पोहोचले आणि नागरिकांना दिलासा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागांत आले नाही. पण ते व्हिसी आणि फोनवरून आम्हा मंत्र्यांसह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि सर्व संबंधितांच्या संपर्कात होते.
Nitin Raut
Nitin Raut

नागपूर : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेस कुठेच पुढे दिसत नाही. कॉंग्रेस बॅकफुटवर गेलीय का? कॉंग्रेस आयसोलेशनमध्ये गेली आहे का, असे प्रश्‍न अनेकांना पडले आहेत. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, कॉंग्रेस आयसोलेशनमध्ये जाऊच शकत नाही, कॉंग्रेस गावागावांत, घराघरांत आहे. कोणता पक्ष आयसोलेशनमध्ये जाईल, हे लवकरच कळेल. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. राऊत विविध विषयांवर बोलले. वीज बिलाच्या संदर्भात ते म्हणाले, तीन टप्प्यांत वीज बिल भरण्याची सुविधा दिलेली आहे. ज्यांनी आधीच नियमित बिले भरली, त्यांना खंत वाटायला नको म्हणून दोन टक्के सवलत दिलेली आहे आणि ६५ टक्के लोकांनी बिले भरलेली देखील आहेत. कुणालाही काहीही अडचण आल्यास माझे दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत. याशिवाय ईमेलवरही नागरिक त्यांच्या तक्रारी करू शकतात. त्यामुळे विनाकारण ओरड करणाऱ्यांनी आता थांबले पाहिजे. 

पूर्व विदर्भात जो महापूर आला, ती खरंच नैसर्गिक आपत्ती होती. मध्यप्रदेश सरकारनेही वेळेपूर्वी सूचना दिली होती. त्याप्रमाणे आम्हीसुद्धा पूर्व विदर्भातील जिल्हा प्रशासनाला कळवले होते. पण १०० मिमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो प्रत्यक्षात ४०० मिमी पडला. चार पट पाऊस पडल्याने आफत झाली. मध्यप्रदेशातल्या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे विदर्भातील नद्या फुगल्या. परिणामी गोसेखुर्दसह सर्व धरणांचे दरवाचे आम्हाला उघडावे लागले आणि महापूर आला, असे डॉ. राऊत म्हणाले.

कुणालाही वाऱ्यावर सोडले नाही
पूरपरिस्थितीमध्ये सरकारने कुणालाही वाऱ्यावर सोडले नाही. मी स्वतः आणि आमचे सहकारी मंत्री पूरग्रस्त भागांत पोहोचले आणि नागरिकांना दिलासा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागांत आले नाही. पण ते व्हिसी आणि फोनवरून आम्हा मंत्र्यांसह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि सर्व संबंधितांच्या संपर्कात होते. मौदा तालुक्यात पाणी वितरणाचा प्लान्ट पाण्याखाली आला होता. तो तात्काळ तयार करण्यात येत आहे. नदीकाठच्या झोपड्या नियमबाह्य असल्या तरी झोपड्यांनाही सर्व नुकसानग्रस्तांसारखी मदत दिली जात आहे. त्यामुळे सरकारने कुणालाही वाऱ्यावर सोडले नाही, असे डॉ. राऊत म्हणाले.

मानकापुरात लवकरच जम्बो कोविड रुग्णालय होणार  
कोरोनाचा लढा अधिक बळकट करण्यासाठी नागपूरच्या मानकापूरमध्ये लवकरच जम्बो कोविड रुग्णालय उभारले जाणार आहे. कोरोनाचे सावट कमीजास्त जगभर आहे. कोरोना हा राजकारणाचा भाग होऊ शकत नाही. पण यामध्ये थोडंफार का होईना राजकारण घडलं. आम्ही सर्वपक्षीय पुढाऱ्यांना सोबत घेऊन कोरोनासोबत दोन हात करीत आहोत. कालच यासंदर्भात नागपूरला बैठक घेतली. बेड, ऑक्सिजन आणि लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली. लवकरच डॅशबोर्ड लागणार आहेत आणि जम्बो कोविड सेंटरलासुद्धा मंजुरी मिळणार असल्याचे डॉ. नितीन राऊत म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com