व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढल्याचा राग, ॲडमिनवर केला प्राणघातक हल्ला.. - whatsapp group admin removed two members they angre and attacked on admin | Politics Marathi News - Sarkarnama

व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढल्याचा राग, ॲडमिनवर केला प्राणघातक हल्ला..

अनिल कांबळे
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास चंद्रमणी आणि छत्रपती यांनी सुनील यांना फोन करून महापालिकेच्या कार्यालयाजवळ बोलावले. त्यांना ग्रुपमधून काढून टाकल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर खुर्ची आणि छन्नीने सुनील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

नागपूर : सोशल मिडियाच्या वापराने जगणे जसे सुलभ झाले आहे, तसेच धोकादायक सुद्धा होत चालले आहे. सायबर गुन्हेगार दररोज कुठे ना कुठे गंडा घालतात, तर वॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये वादावादी होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत होण्याच्याही घटना वाढत चालल्या आहेत. अशाच एका घटनेत ग्रुप ॲडमिनने दोन सदस्यांना ग्रुपमधून काढले. त्याचा राग धरून दोन्ही सदस्यांनी ॲडमिनवर प्राणघातक हल्ला चढवला. 
या प्रकरणी आरोपी सदस्यांवर सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव (४९) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील करमचंद अलीमचंदानी (मेश्राम पुतळा चौक, सदर) आणि आरोपी चंद्रमणी यादव हे दोघेही महापालिकेत कंत्राटदार आहेत. सुनील अलीमचंदानी यांनी दोन वॉट्स्ॲप ग्रुप तयार केले. या ग्रुपमध्ये आरोपी चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव हे दोघेही सदस्य होते. या ग्रुपमध्ये तीन दिवसांपूर्वी काही एसएमएस टाकले. त्यामुळे ग्रुपमध्ये काही जणांनी आक्षेप घेतले. त्यावर अनेकांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुनील यांनी दोघांनाही दोन्ही वॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकले. त्यामुळे दोघेही आरोपी चिडले होते. त्यांना रागाच्या भरात सुनील यांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. 

शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास चंद्रमणी आणि छत्रपती यांनी सुनील यांना फोन करून महापालिकेच्या कार्यालयाजवळ बोलावले. त्यांना ग्रुपमधून काढून टाकल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर खुर्ची आणि छन्नीने सुनील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. डोक्यात छन्नीचा घाव लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुनील यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

(Edited By : Atul Mehere) 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख