काय करणार... नामबंधू म्हटल्यावर घ्यावं लागतं सांभाळून !

एका संजयची बाजू दुसरा संजय पूर्णपणे सांभाळून घेत आहे. एरवी नको त्या विषयावरही सामनातून खरडत बसणारे संजय राऊत यांना संजय राठोडबद्दल लिहायला सुचत नाही की त्यांच्या पेनाची शाई संपली आहे,
Sanjay Rathod - Sanjay Raut
Sanjay Rathod - Sanjay Raut

नागपूर : बीड जिल्ह्याच्या परळी येथील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षाचे लक्ष्य ठरलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत गेल्या १५ दिवसांत ब्रश शब्दही बोलले नाहीत. त्यामुळे भाजपने आता त्यांना सोशल मिडियावरून टार्गेट केले आहे. ‘काय करणार... नामबंधू म्हटल्यावर घ्यावं लागतं सांभाळून !’, अशा आशयाचा मजकूर प्रसारित करून भाजपने संजय राऊतांवर सडकून टिका केली आहे. 

समाजमाध्यमावरून टिका करताना भाजपने म्हटले आहे की, ‘महाभारतात होते, त्या संजयइतक्याच दूरदृष्टीचे दुसरे एक संजय आपल्याकडे आहेत. ते जगातल्या सगळ्या गोष्टींबाबत ‘ग्यान’ देत असतात. पण वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत त्यांनी काहीच बोललं वा लिहिलं नाही. काय करणार... नामबंधू म्हटल्यावर घ्यावं लागतं सांभाळून...’ एका संजयची बाजू दुसरा संजय पूर्णपणे सांभाळून घेत आहे. एरवी नको त्या विषयावरही सामनातून खरडत बसणारे संजय राऊत यांना संजय राठोडबद्दल लिहायला सुचत नाही की त्यांच्या पेनाची शाई संपली आहे, असाही मजकूर भाजपने प्रसारित केला आहे. 

‘आयटी सेल बिथरली आहे वाटतं, काहीही टाकायला लागले आहेत.’ ‘काल पोहरादेवी येथे जे लोक जमले होते, ते सर्व भाजप समर्थक होते. संजय राठोड यांना अडचणीत आणण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे.’ ‘आपला तो बाल्या’, ‘अग्रलेख सम्राट गप्प का?’, असा प्रतिक्रिया भाजपच्या त्या मजकुरावर उमटल्या आहेत. हा मजकूर टाकून भाजपने खासदार संजय राऊत यांना डिवचले आहे. यावर ते काय उत्तर देतात, याकडे आता नेटकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राऊत उत्तर देणार की मौनच पाळणार, याचीही विचारणा सोशल मिडियावर नेटकऱ्यांकडून होऊ लागली आहे. 

पूजा चव्हाणच्या मृत्युप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सरकारमधल्या कुण्याही मंत्र्याला विचारणा केल्यास, ‘चौकशी सुरू आहे, अहवाल आल्यानंतर यावर बोलता येईल’, येवढेच ठेवणीतले उत्तर दिले जाते. पण या प्रकरणात उपस्थित झालेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायला कुणीही अद्याप पुढे आलेले नाही. चौकशीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. त्यातच काल वाशीम जिल्ह्याच्या पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांच्या कालच्या कृत्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही प्रश्‍न केले जात आहेत. पण ते सध्यातरी मौन पाळून आहेत. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लवकर लागून जावा एकदाचा, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com