असे काय केले जिल्हा परिषदेच्या जगापूर शाळेने की राज्यभर होतेय कौतुक... - what did jagapur school of zillha parishad that it appreciated all over state | Politics Marathi News - Sarkarnama

असे काय केले जिल्हा परिषदेच्या जगापूर शाळेने की राज्यभर होतेय कौतुक...

दिनकर गुल्हाने
शनिवार, 1 मे 2021

लॉकडाऊनमध्ये मागील वर्षापासून संपूर्ण राज्यात प्रत्येक शिक्षक राबवीत असलेला ऑनलाइन टेस्ट हा उपक्रम ३ वर्षांपूर्वी जगापूर शाळेने राज्याला दिलेला उपक्रम आहे. जगापूर शाळेने ऑनलाइन टेस्ट करण्यासंदर्भात राज्यातील शेकडो शिक्षकांना त्यावेळेस मार्गदर्शन सुद्धा केले आहे.

पुसद (जि. यवतमाळ) : स्पर्धेच्या युगात खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे पालकांचा व मुलांचा कल असताना पुसद तालुक्यातील मात्र जिल्हा परिषदेची जगापूर शाळा आपल्या वेगळ्या उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. जगापूर शाळेने यावर्षी पहिली ते आठवीच्या मुलांचा निकाल आज १ मे रोजी ऑनलाइन घोषित करून एक आगळावेगळा विक्रम केला आहे. राज्यात कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता या वर्षी शाळा ऑनलाइन भरविण्यात आल्या आणि वर्षाच्या शेवटी शाळेचा निकालसुद्धा दहावी व बारावीच्या परीक्षेसारखा ऑनलाइन घोषित केल्याने शिक्षण प्रशासनाने जगापूर शाळेचे विशेष कौतुक केले.

यवतमाळ जिल्हा मुख्यालयाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या पुसद तालुक्यातील जगापूरच्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवी अशा एकूण ८ वर्गाचे जवळपास १४० विद्यार्थी शिक्षण घेत असून केवळ ३ शिक्षक कार्यरत आहे. शाळेचा परिसर, शाळेची गुणवत्ता आणि विविध शालेय उपक्रमासांठी वेगळी ओळख आहे. शाळेतील आदर्श उपक्रमशील शिक्षक जगदीश जाधव हे १९ वर्षांपासून शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी खडकाळ जमिनीवर एक इको फ्रेंडली आणि उपक्रमशील शाळा बनविण्याची मोठी किमया साधली आहे. सदैव शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, खेळ व क्रीडा या संपूर्ण प्रकारात शाळा उत्कृष्ट कार्य करताना पाहायला मिळते. शाळेमध्ये शिक्षकांचा अभाव असला तरी शाळेचे मुख्याध्यापक जगदीश जाधव, पदवीधर शिक्षक महेश सूर्यवंशी आणि सहाय्यक शिक्षक नागेश जोगदे हे अभिनव उपक्रम सहज राबवितात.
 

लॉकडाऊनमध्ये मागील वर्षापासून संपूर्ण राज्यात प्रत्येक शिक्षक राबवीत असलेला ऑनलाइन टेस्ट हा उपक्रम ३ वर्षांपूर्वी जगापूर शाळेने राज्याला दिलेला उपक्रम आहे. जगापूर शाळेने ऑनलाइन टेस्ट करण्यासंदर्भात राज्यातील शेकडो शिक्षकांना त्यावेळेस मार्गदर्शन सुद्धा केले आहे. ३ वर्षांपूर्वीच्या ऑनलाइन टेस्ट उपक्रमासोबतच ऑनलाइन निकालसुद्धा संपूर्ण राज्यासाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्र दिनी शिवभोजन थाळीने ओलांडला चार कोटींचा टप्पा : छगन भुजबळ

प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी यांच्या प्रेरणेने आणि पुसद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, पुसद आय.टी. सेलचे प्रमुख तथा केंद्रप्रमुख अमित बोजेवार, तसेच शेंबाळपिंपरी केंद्रप्रमुख प्रकाश टेकाळे यांच्या सहकार्याने जगापूर शाळेने ऑनलाइन निकाल तयार करून प्रसारित केला. हा निकाल हाती मिळताना शाळकरी विद्यार्थी आनंदित झाले. यासाठी मुख्याध्यापक जगदीश जाधव, महेश सूर्यवंशी व तंत्रस्नेही शिक्षक नागेश जोगदे यांनी विशेष प्रयत्न केले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख