well done nagpur coronary artery disease recovery rate is highest average seventy four percent | Sarkarnama

वेल डन नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 22 मे 2020

रुग्ण उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण भारतात 40.4 टक्के तर राज्यात 26.3 टक्के एवढे असून त्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात तसेच देशातही सर्वाधिक आहे.

नागपूर : कोरोना बाधित रुग्णांवर प्रभावी व परिणामकारक उपचारांमुळे भारतात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नागपुरात आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित 409 नागरिकांपैकी 299 रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. कोरोनामधून सरासरी 74 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली. 

रुग्ण उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण भारतात 40.4 टक्के तर राज्यात 26.3 टक्के एवढे असून त्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात तसेच देशातही सर्वाधिक आहे. कोरोना बाधितांच्या तपासणीसह उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वतंत्र कोविड वॉर्ड तयार करण्यात आला. त्यासोबतच उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांची चमू चोवीस तास उपलब्ध असल्यामुळे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी शहरात पाच अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. यामध्ये शहरातील 9 हजार 818 स्वॅबच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना बाधितांमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये जगात सर्वाधिक जर्मनी येथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.9, इटली 53.3, फ्रान्स 34.9, अमेरिका 23.3, रशिया 27.7 आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 40.4 टक्के तर महाराष्ट्रात 26.3 टक्के एवढी आहे. त्या तुलनेत नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्ण पूर्ण बरे होण्याचे प्रमाण 74 टक्के असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख