अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचे आम्ही स्वागत करतो : प्रवीण कुंटे पाटील - we welcome the arrest of arnab goswami said pravin kunte patil | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचे आम्ही स्वागत करतो : प्रवीण कुंटे पाटील

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही.

नागपूर : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण वैयक्तिक आहे. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयानेही काही संबंध नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आज दिवसभरात जे काही चालविले आहे, त्याचा काही एक फरक पडणार नाही. कारण महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे गोस्वामींच्या अटकेचे आम्ही स्वागत करतो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील म्हणाले. 

सरकारने लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर हल्ला केला आहे, अशी जी काही ओरड केली जात आहे. त्यात काही दम नाही. कारण प्रामाणिकपणे आपले काम करणारे पत्रकारही या प्रकरणात गोस्वामींच्या सोबत उभे राहीले नाही. पोलिसांनी जी कारवाई केली, ती एका गुन्ह्याच्या तपासात केली आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात कितीही ओरडल्याने काहीही होणार नाही. सत्तेसाठी हपापलेल्या या मंडळींकडे जनतेनेही दुर्लक्ष करणे शिकून घेतले आहे. आज दिवसभरात या लोकांनी जो आकांडतांडव केला, त्यामुळे यांना असे वाटत आहे की, महाविकास आघाडीचे सरकार पडेल, पण हे सरकारचा पाया भक्कम आहे. त्यामुळे हे त्यांच्यासाठी दिवास्वप्नच ठरणार आहे. 

मे २०१८ मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्नब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती. पण तो ती देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. 

अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरूण वाट्टेल तसे उद्योग करणाऱ्यांचे समर्थन कदापिही योग्य नाही. कायद्याला त्याचे काम करू देणे, हेच योग्य ठरेल. सरकार आपले काम योग्यरित्या करीत आहे. सरकारच्या या कारवाईचे आम्ही स्वागत करतो, असे प्रवीण कुंटे पाटील म्हणाले.     (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख