मृत्यूदर कमी करायचाय, दररोज ७० हजारांवर लोकांना देणार लस... - we want to reduce the death rate we will vaccinate over seventy thousand people | Politics Marathi News - Sarkarnama

मृत्यूदर कमी करायचाय, दररोज ७० हजारांवर लोकांना देणार लस...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

कोविडसोबतच्या या लढ्यामध्ये मोठे मनुष्यबळ लागणार आहे, ते आम्ही मागितले. त्यांपैकी बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पण अद्यापही काही लोक कामावर रुजू झालेले नाहीत. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांत त्यांची तक्रार करण्यात येईल.

नागपूर : कालपर्यंत आपण दर दिवशी ३२ हजार याप्रमाणे कोविडचे लसीकरण केलेले आहे आणि हे आपल्याला दररोज ७० हजाराच्या वर घेऊन जायचे आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. शहरात ४० शासकीय लसीकरण केंद्र आणि ४६ अशासकीय केंद्र तयार करण्यात आले आहेत. सोमवारपासून आपण एकूण १६४ केंद्र सुरू करणार आहोत. जनतेला, लोकप्रतिनिधींना आणि पत्रकारांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या भागांतील जास्तीत जास्त लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घ्यावे. हे एक पवित्र काम आहे, त्यामुळे प्रत्येकानेच यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले. 

आपण हे काम करून लोकांचा जीव वाचवू शकतो. अशा लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. काही लोकांमध्ये अजूनही गैरसमज आहेत की, या लसीकरणामुळे काहीही फायदा होत नाही. पण तसे नाहीये. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः, विभागीय आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व यंत्रणा याच कामात गुंतली आहे. त्याचा फायदा लोकांना होतो आहो आणि आताही जास्तीत जास्त लोकांना तो घ्यावा. समज, गैरसमज असतातच पण कोरोनाच्या बाबतीत कुणीही गैरसमज ठेवू नये आणि लस टोचून घ्यावी. कोविडला परतवायचे असेल तर लस त्यावरचा सद्यःस्थितीतला उत्तम उपाय आहे, असे डॉ. राऊत म्हणाले. 

लसीकरण मोहिमेत जिल्ह्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि तालुक्यांसाठी तहसीलदार यांना समन्वयक म्हणून आम्ही नियुक्त केले आहे. यासाठी कॉल सेंटरही सुरू केले आहे. या सेंटरमध्ये १२ टीम कार्यरत आहेत. महानगरपालिकेच्या क्षेत्रात वेगळे कॉल सेंटर कार्यरत आहे. यावर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निगराणी ठेवणार आहेत. कोरोना रुग्णांसाठी बेड्स वाढविण्याची मागणी सर्व स्तरांतून होत होती. मेडिकल हॉस्पिटलमध्ये आणखी १०० बेड्सची व्यवस्था आज करण्यात आली आहे. सोमवारपासून ते उपयोगात येणार आहेत. आसीयुचे ३० आणि ऑक्सीजनचे ३० बेड्स तयार करण्यात आले आहेत. ऑक्सीजनच्या उपलब्धतेसाठी सरकारसोबत नियमित संपर्क सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याला ऑक्सीजनची कमतरता जाणार नाही, असेही ते म्हणाले. 

नागपूर जिल्ह्यात मौदा आणि रामटेक तालुक्यात नव्याने कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहेत. वेकोलि आणि मॉयल परिसरात खाण कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्याचे निर्देश आज दिले. खासगी डॉकटरकडे आलेल्या साध्या रुग्णाला ताप जरी असेल, तर त्याची आरटीपीसीआर चाचणी करणे आता अनिवार्य करण्यात येणार आहे. जर तो रुग्ण त्यासाठी तयार होत नसेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

हेही वाचा : दीपाली चव्हाण यांच्या बदलीसाठी पैसे खाणारा ‘तो’ कोण ?

सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर होणार कारवाई…
कोविडसोबतच्या या लढ्यामध्ये मोठे मनुष्यबळ लागणार आहे, ते आम्ही मागितले. त्यांपैकी बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पण अद्यापही काही लोक कामावर रुजू झालेले नाहीत. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांत त्यांची तक्रार करण्यात येईल. पोलिसांना सूचना दिल्या आहेत की, डॉक्टर सन्माननीय लोकं आहेत. त्यामुळे ते का रुजू झाले नाहीत, याची आधी चौकशी करा. त्यानंतरच मग सक्तीची कारवाई करा. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख