'आम्ही मत मांडले, तुम्हाला योग्य वाटत असेल तर छापा, नाही तर...' - we voted print if you think it is right if not | Politics Marathi News - Sarkarnama

'आम्ही मत मांडले, तुम्हाला योग्य वाटत असेल तर छापा, नाही तर...'

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

प्रसार माध्यमांसोबत वार्तालाप सुरू असताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून एकेरी उल्लेख झाल्याने उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. अखेर चंद्रकांतदादांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरण आटोपते घेतले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासंदर्भात त्यांना प्रश्‍न करण्यात आला होता, त्यावर उत्तर देताना त्यांच्याकडून प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींसंदर्भात एकेरी उल्लेख झाला होता.

अमरावती : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आहे. पण पत्रकारांकडून त्यांच्या अटकेचा कुठेही निषेध होत नाहीये. असे असताना भारतीय जनता पक्षाला अर्णवचा येवढा कळवळा का, असा प्रश्‍न पत्रकारांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला. त्यावर आम्ही आमचे मत मांडले, प्रसार माध्यमांना योग्य वाटत असेल तर छापा, अशा शब्दात त्यांनी पोलिस कारवाईचा व राज्य सरकारचा निषेध केला. सोबतच राज्यातील महाविकास आघाडी सर्व आघाड्यांवर अपयशी झाल्याचाही आरोप केला.

कोरोना संक्रमण आटोक्‍यात येत असताना भाजपने संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून बैठकांना सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज अमरावतीत आले असताना प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. अनिल बोंडे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, संजय कुटे, चैनसुख संचेती, आमदार प्रताप अडसड, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, महापौर चेतन गावंडे, माजी सभापती तुषार भारतीय यावेळी उपस्थित होते. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना संक्रमण नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवतानाच त्यांनी शिक्षण, कृषी, शेतकरी सहकार्य, मराठा आरक्षण, कर्जमाफी या सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी झाले आहे. राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीने बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारने केवळ घोषणा केली असून ही मदत तोकडी असल्याचे व शिक्षण विभागासह मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केल्याचा आरोप श्री पाटील यांनी केला. 

अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा उल्लेख त्यांनी राज्यात प्रसार माध्यमांवर अघोषित आणीबाणी लागू करण्यात आल्याचा करतानाच दंडूकेशाही असल्याचा आरोप केला. मात्र या अटकेचा निषेध पत्रकारांकडूनच होत नसल्याने त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी आम्ही आमचे मत व्यक्त केले, तुम्हाला छापायचे असेल तर छापा, असे उत्तर देत सुटकेचा मार्ग स्वीकारला. मात्र नंतर गोस्वामींना अटक करण्याची पद्धत चुकीची वाटल्याने निषेधात्मक भूमिका घेतली, अशा शब्दात त्यांनी सारवासारव केली.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ भाजप लढणार
अमरावती शिक्षक व नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार देणार आहे. मात्र या उमेदवारांना पक्षीय चिन्ह राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाकडे या दोन्ही मतदारसंघातून भरपूर नावे आली असून राज्याची कोअर समिती छाननी करून ते केंद्राकडे पाठविणार आहे. केंद्राची मोहोर उमटल्यानंतर त्यांच्या नावांची घोषणा केली जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली. दोन्ही मतदारसंघांतील निवडणुका भाजप ताकदीने लढविणार आहे, असेही ते म्हणाले. येत्या दोन-तीन दिवसांत नावे जाहीर होण्याची शक्‍यता त्यांनी वर्तविली.

अखेर दिलगिरी
प्रसार माध्यमांसोबत वार्तालाप सुरू असताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून एकेरी उल्लेख झाल्याने उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. अखेर चंद्रकांतदादांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरण आटोपते घेतले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासंदर्भात त्यांना प्रश्‍न करण्यात आला होता, त्यावर उत्तर देताना त्यांच्याकडून प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींसंदर्भात एकेरी उल्लेख झाला होता.      (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख