आम्ही सरकार आहोत, सावकार नाही : डॉ. नितीन राऊत 

या उन्हाळ्यात लोकं बाहेरगावी गेले नाहीत. सर्व जण पूर्ण वेळ घरी होते. बऱ्याच लोकांनी "वर्क फ्रॉम होम' केले. त्यामुळे घरातील विजेचा वापर वाढला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी "त्या' तीन महिन्यांचे बिल थोडे जास्त असेल. ही गोष्ट वीज ग्राहकांनी समजून घेतली पाहीजे.
Nitin Raut
Nitin Raut

नागपूर : वीज बिलाच्या संदर्भात ग्राहकांची ओरड होत असल्याचे जे चित्र निर्माण केले जात आहे. वास्तविक पाहता ते तसे नाही. तीन महिन्याचं बिल एकत्र पाठवल्यामुळे रक्कम मोठी दिसत आहे. वीज ग्राहक स्वतः वेबसाईटवर जाऊन आपले समाधान करु शकतात. पण काही लोक म्हणतात, बील माफ 
करा, फुकटात वीज द्या. तसे होणार नाही. कारण वीज निर्मितीसाठी खर्च येतो. भाजप, मनसे वीज बिलांच्या संदर्भात जी आंदोलने करीत आहेत, ती त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी आहेत. आम्ही बिले देताना कुठलीही सावकारी पद्धत वापरलेली नाही. कारण आम्ही "सरकार आहोत, सावकार नाही', असे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत "सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. 

लॉकडाऊनमध्ये लोकांनी हे अजिबात म्हटलेले नाही की आम्हाला वीज मिळालीच नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी 24 बाय 7 सेवा देत अखंड वीज पुरवठा सुरू ठेवला. कुठेही वीज खंडीत झाली की आमचे कर्मचारी तत्काळ धाव घेऊन त्याची दुरुस्ती करतात. कोरोनाच्या लढ्यात कन्टेंनमेंट झोनमध्ये जाऊनसुद्धा कर्मचाऱ्यांनी कामे केली आणि अखंड वीज पुरवठा केला. बिल भरण्यासाठी तीन हप्ते पाडून दिले, एकत्र बिल भरणाऱ्यांना दोन टक्के सवलत दिली. यापेक्षा आणखी काय केले पाहीजे. डॉक्‍टर्स, नर्स, पोलीस, सफाई कामगार या सर्वांना कोरोना योद्धा म्हटले जाते. पण आमच्या कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा असा उल्लेख कुणीही केलेला नाही. याबद्दल डॉ. राऊत यांनी खंत व्यक करीत वीज कर्मचारी योद्धे नाहीत का, असा सवालही केला. 

डॉ. राऊत म्हणाले, तुटवडा पडला की खासगी कंपन्यांकडून विकत घेऊन आम्ही जनतेला वीज देतो. एप्रीलमध्ये 1800 मेगावॅट आणि मे महिन्यात 1102 मेगावॅट वीज विकत घेतली आहे. वीज ग्राहकांना आम्ही वाढीव दराने बिले दिलेली नाहीत. 22 मार्चला देशात लॉकडाऊन सुरू झाला. 20 मार्चला आम्ही सर्व ग्राहकांना विनंती केली, की तुम्ही मीटर रीडींगचे फोटो पाठवा. आम्ही त्यानुसार बिल पाठवू. पण केवळ दोन ते तीन टक्के लोकांनीच प्रतिसाद दिला. त्यामुळे आता ज्या-ज्या परीसरातील लॉकडाऊन संपला त्या-त्या ठिकाणी बिले पाठवली. पण ती सरासरी देण्यात आली. 

ज्यांना असं वाटत असेल की वाढीव बिले आलेली आहेत. त्यांनी ती बिले महावितरणच्या लिंकवर जाऊन तपासावी. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्याचे बिल किती आहे आणि याच महीन्यांचे गेल्या वर्षीचे बिल किती आले होते. दोहोंमध्ये फार फरक नसेल. यावेळी आलेले बिल थोडे जास्त असेल कारण या उन्हाळ्यात लोकं बाहेरगावी गेले नाहीत. सर्व जण पूर्ण वेळ घरी होते. बऱ्याच लोकांनी "वर्क फ्रॉम होम' केले. त्यामुळे घरातील विजेचा वापर वाढला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी "त्या' तीन महिन्यांचे बिल थोडे जास्त असेल. ही गोष्ट वीज ग्राहकांनी समजून घेतली पाहीजे. 

विजेचे बिल वाढीव दराने आले, असे जे म्हटले जात आहे. ते सर्वथा चुकीचे आहे. आम्ही जी सरासरी काढली, ती उन्हाळ्यांतील महिन्यांची नाही, तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या थंडीतील तीन महिन्यांची आहे. या काळात विचेचा वापर कमी होतो. आता प्रत्यक्ष रीडींग घेतल्यानंतर आलेले बिल जास्त वाटणारच आहे. पण तांत्रिकदृष्ट्या ग्राहकांनी ते तपासून पाहीले, तर त्यांच्याच लक्षात ही बाब येऊ शकते. काही ठिकाणी विद्यार्थी राहात होते. पण लॉकडाऊनच्या काळात ते आपआपल्या घरी गेले. काही लोक खेड्यांवर किंवा फार्महाऊसवर राहायला गेले. अशा वेळी त्यांचे घर बंद होते. पण अशा लोकांना जर जास्त बिल आले असेल तर त्यांनी महावितरणच्या वेबसाईटवर किंवा माझ्या स्वतःच्या energyminister@discom.in ईमेलवर माहीती द्यावी. ती बिले तत्काळ दुरुस्त केली जातील, असे डॉ. राऊत म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com