आम्ही अंधारात, तर आता तुम्हीही राहा अंधारातच, तुपकरांना महावितरणला शाॅक...

तुम्ही जेवढे बिल पाठवले, तेवढे पूर्ण भरण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आहे. तुम्ही अव्वाच्या सव्वा बिले पाठविली आहेत. तुम्ही १० हजार पाठवले म्हणून तेवढे भरलेच पाहिजे, असे नाही. ज्यांची ऐपत २ हजार रुपये भरण्याची आहे, तो तेवढे भरेल. पण याचा अर्थ तुम्ही वीज कापावी असा होत नाही
Ravikant Tupkar at mahavitaran
Ravikant Tupkar at mahavitaran

नागपूर : महावितरणने बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने वीज कनेक्शन कापलेले आहेत. घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड असंतोष आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यामुळे चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयाची वीज कापून टाकली. आम्ही अंधारात, तर आता तुम्हीही राहा अंधारातच, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 

यावेळी माध्यमांशी बोलताना तुपकर म्हणाले, एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात की, कनेक्शन आम्ही कापणार नाही आणि ऊर्जामंत्री म्हणतात की वसुलीसाठी कनेक्शन कापा. आज आम्ही महावितरणच्या कार्यालयात अधीक्षक अभियंता दिवाते यांना भेटलो. त्यांना सांगितलं की, बुलडाणा जिल्ह्यातील कापलेले कनेक्शन ताबडतोब जोडून द्या. जर का तुम्ही तसे केले नाही तर आम्ही संपूर्ण महावितरण कंपनी अंधारात टाकू. सध्या आम्ही येथील महावितरणची लाइन बंद केली आहे. बुलडाणा जिल्ह्याचे मुख्य कार्यालय आम्ही अंधारात टाकलेलं आहे. आम्ही अंधारात आहोत, तर त्यांनाही आम्ही अंधारात टाकू, अशा निर्धार या ठिकाणी केला आहे.

जोपर्यंत कापलेले वीज कनेक्शन पूर्ववत जोडले जाणार नाही, तोपर्यंत अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयातील आमचे आंदोलन असेच सुरू राहणार आहे. नाहक शेतकऱ्यांना त्रास देणारी महावितरण शॉक दिल्याशिवाय सुधरणार नाही, असे म्हणत तुपकरांनी अधीक्षक अभियंत्यांना घेराव केला आहे. आजच्या आज कापलेले वीज कनेक्शन जोडण्याची त्यांची मागणी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची वीज पूर्ववत सुरू करणार नाही, तोपर्यंत अभियंत्यांना येथून जाऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांचे हे आंदोलन आता चिघळते की काय, असे वाटू लागले आहे. 

तुम्ही जेवढे बिल पाठवले, तेवढे पूर्ण भरण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आहे. तुम्ही अव्वाच्या सव्वा बिले पाठविली आहेत. तुम्ही १० हजार पाठवले म्हणून तेवढे भरलेच पाहिजे, असे नाही. ज्यांची ऐपत २ हजार रुपये भरण्याची आहे, तो तेवढे भरेल. पण याचा अर्थ तुम्ही वीज कापावी असा होत नाही, असेही तुपकरांनी अधीक्षक अभियंत्यांना सुनावले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात विजेची स्थिती बिकट झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एक बोलतात अन् ऊर्जामंत्री मात्र भलतेच बोलतात. त्यामुळे यांच्यामध्ये तारतम्य नाही. त्याचा फटका मात्र सामान्य ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com