भाजपच्या ५८ वर्ष राखलेल्या गडाला भगदाड पाडून वंजारींनी रचला इतिहास ! - wanjari tearing down bjps fort of fifty eight years and made history | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या ५८ वर्ष राखलेल्या गडाला भगदाड पाडून वंजारींनी रचला इतिहास !

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सर्वच नेते व कार्यकर्त्यांनी मेहनत घेत विजयासाठी प्रयत्न केले. याला जनतेच्या आशीर्वादाची जोड मिळाली. त्यामुळेच विजय सहज शक्य झाला. 

नागपूर : गेल्या ५८ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या नागपूर पदवीधर मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांचा पराभव केला. अतिशय मजबूत समजल्या जाणाऱ्या गडाला वंजारींनी भगदाड पाडून महाविकास आघाडीची ताकत दाखवून दिली. कॉंग्रेसने मनावर घेतले तर त्यांच्या उमेदवाराचा पराभव कुणीही करू शकत नाही, हेही त्यांनी दाखवून दिले. 

नागपूर पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसने भाजपच्या गडाला सुरुंग लावत विजयी पताका फडकविली. महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव केला. आज दुपारी पार पडलेल्या मतमोजणीनंतर त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. ॲड. अभिजित वंजारी यांना ६१ हजार ७०१ मते, तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते मिळाली.
 
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या १ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर काल सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीस सुरुवात झाली. यामध्ये अभिजित वंजारी यांना पाचव्या फेरीत ५६ हजार ५३० तर संदीप जोशी यांना ४१ हजार १७२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. यामध्ये वंजारी यांना १४ हजार ३५८ मतांची आघाडी होती. मात्र, एकूण मतानुसार ठरलेला ६० हजार २४७ मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांनी पूर्ण केला नसल्याने बाद फेरीस सुरुवात करण्यात आली. यामध्ये आज दुपारी १ वाजताच्या सुमारास अभिजित वंजारी यांनी ६१ हजार ७०१ मत घेऊन कोटा पूर्ण करीत विजय पटकाविला. 

भाजपचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मत मिळाली. यानंतर विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी ॲड. अभिजित वंजारी यांना प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, सेनेचे खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, नाना गावंडे, राष्ट्रवादीचे नेते आणि कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभिजित वंजारी यांच्या विजयाने कॉंग्रेससह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला.

कार्यकर्ते, नेत्यांच्या मेहनतीचा विजय - अभिजित वंजारी 
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सर्वच नेते व कार्यकर्त्यांनी मेहनत घेत विजयासाठी प्रयत्न केले. याला जनतेच्या आशीर्वादाची जोड मिळाली. त्यामुळेच विजय सहज शक्य झाल्याचे ॲड. अभिजित वंजारी म्हणाले. मिळालेला विजय सर्वसमावेशक असून जनतेचा विश्वास सार्थ करायचा आहे. त्यासाठी पूर्णवेळ प्रयत्न करणार आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख