वडेट्टीवार म्हणाले, महाज्योतीला पूर्णवेळ अधिकारी देणार ! - wadettiwar said mahajyoti will be given full time officer | Politics Marathi News - Sarkarnama

वडेट्टीवार म्हणाले, महाज्योतीला पूर्णवेळ अधिकारी देणार !

निलेश डोये
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

प्रदीप डांगे यांची व्यवस्थापक पदा नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना गोंदिया जिल्हा परिषदचे सीईओ करण्यात आले. त्यांच्याचकडे याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. लवकरच महाज्योतीला पूर्ण वेळ अधिकारी मिळणार आहे.

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (महाज्योती) पूर्णवेळ अधिकारी नाही. प्रभारी अधिकाऱ्याच्या भरोशावर संस्थेचे काम सुरू आहे. पण आता लवकरच संस्थेला पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे ओबीसी कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. बार्टी, सारथीच्या धर्तीवर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना दीड वर्षापूर्वी करण्यात आली. ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन महत्त्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.  

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी याची स्थापना करण्यात आली. मागासवर्गीय व दुर्लक्षित आणि वंचित समाजाची स्थिती सुधारण्यासाठी विविध सर्वेक्षण करणे, स्वयंरोजगार व रोजगारासाठी प्रशिक्षण व अन्य प्रकारची मदत उपलब्ध करून देणे, शेती व इतर औद्योगिक व्यवसायांची स्थापना करणे, यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, समुपदेशन करणे व हेल्पलाईन सुरू करणे, एम.फिल/पी.एच.डी. अशा उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे, जातीभेद, वर्णभेद, अंधश्रध्दा निर्मूलन या क्षेत्रातील जागृतीसाठी कार्य करणे, असे विविध कार्य करण्यात येणार होते. 

अद्याप कोणत्याही प्रकारचे कार्य प्रत्यक्षात सुरू झाले नाही. याचे मुख्यालय नागपूर येथे स्थापित करण्यात आले. या संस्थेला पूर्णवेळ अधिकारी नसून प्रभारीवर काम सुरू आहे. याची दखल घेत ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, प्रदीप डांगे यांची व्यवस्थापक पदा नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना गोंदिया जिल्हा परिषदचे सीईओ करण्यात आले. त्यांच्याचकडे याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. लवकरच महाज्योतीला पूर्ण वेळ अधिकारी मिळणार आहे. तशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. ५० कोटींचा निधी मिळाला असून जादा निधीची मागणीही करण्यात आली. त्याचप्रमाणे याला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.            (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख