वडेट्टीवार म्हणाले, पूर्ण लॉकडाउन करणे अत्यावश्यक, जगाने स्विकारला हा पर्याय... - wadettiwar said complete lock down is essential this option accepted by the world | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

वडेट्टीवार म्हणाले, पूर्ण लॉकडाउन करणे अत्यावश्यक, जगाने स्विकारला हा पर्याय...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

कोरोनाची स्थिती दिवसागणिक भयावह होत चालली आहे. उगाच सण साजरा करण्यासाठी उत्साहाच्या भरात बाहेर पडून कोरोनाला घरात आमंत्रण देऊ नका. एक वर्ष कमी साहित्यांत सण केला तर काही बिघडणार नाही. मात्र सण साजरा करायच्या नादात कोरोना घरात शिरला तर मात्र मोठी आपत्ती ओढावू शकते.

नागपूर : महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या टाळण्यासाठी पूर्ण लॉकडाउन लावणे अत्यावश्यक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सहा लाख सक्रिय बाधितांची संख्या लक्षात घेता साखळी तोडणे महत्त्वाचे असून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व तरुणाईतील संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन हाच उपाय असल्याचे ते म्हणाले. कडक लॉकडाऊन न लावल्यास महाराष्ट्रात भयावह परिस्थिती होईल, असा इशारा देत हा पर्याय जगाने स्वीकारलेला असल्याने तोच योग्य असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्रावर ही परिस्थिती ओढवल्यास लाखो जीव जातील, हे त्यांनी आवर्जून सांगितले. 

यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारू या !
मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असल्याने गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर जाऊ नका, घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा, असे आवाहनही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारू या, अशी भावनिक साद त्यांनी राज्यातील जनतेला घातली आहे. 

गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी दारावर तोरण हमखास लावले जाते. त्याशिवाय गुढी उभारून तिला साखरगाठ्यांची माळ घातली जाते. सोनेखरेदी, कपडे खरेदीही केली जाते. मात्र, या खरेदीसाठी यंदा घराबाहेर पडू नये, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुढीपाडव्याला खरेदीसाठी बाहेर जाऊ नका. खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी केली तर महाविकास आघाडी सरकारच्यावतीने कोरोनापासून संरक्षणासाठी उचलण्यात येत असलेल्या कठोर उपाययोजनांचा उपयोग होणार नाही, याचीही जाणीव त्यांनी करून दिली आहे. 

यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असले तरी घरोघरी गुढ्या उभारल्या जातील. परंतु शोभायात्रांचं आयोजन व सामूहिक आयोजन टाळण्याचे आवाहन मंत्री वडेट्टीवार यांनी केले आहे. ते म्हणाले की, साखरेच्या गाठी स्वतःच घरी तयार करा. घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा मात्र बाजारात गर्दी करू नका. बत्ताशांऐवजी घरातच गोड पुऱ्या करून त्यांचा हार गुढीला घालता येईल. पूर्वी घरोघरी श्रीखंड घरातच तयार करत असत. तोच कित्ता पुन्हा गिरवता येईल, अशा आठवणीही त्यांनी जागवल्या. नागरिकांनी यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असं आवाहन वडेट्टीवार यांनी नागरिकांना केलं  आहे. 

हेही वाचा : रेमडेसिव्हरची निर्यातबंदी म्हणजे केंद्र सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण…

कोरोनाची स्थिती दिवसागणिक भयावह होत चालली आहे. उगाच सण साजरा करण्यासाठी उत्साहाच्या भरात बाहेर पडून कोरोनाला घरात आमंत्रण देऊ नका. एक वर्ष कमी साहित्यांत सण केला तर काही बिघडणार नाही. मात्र सण साजरा करायच्या नादात कोरोना घरात शिरला तर मात्र मोठी आपत्ती ओढावू शकते. ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या स्ट्रेनमध्ये अद्यापही कोरोनाची लागण झालेली नाही, त्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. काहीच दिवसांचा अवधी आहे. सरकार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पूरजोर प्रयत्न करीत आहे. तोपर्यंत सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे गुढीपाडवा आणि त्यानंतरही ओळीने येणारे सण हे घरच्या घरी आणि साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख