शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेल्या विजय पाटील यांना जिल्हाध्यक्षपदाची लॉटरी...

मूळचे काँग्रेसचे असलेले विजय पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या समोर उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत विजय पाटील यांना चांगली मतेही मिळाली होती.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

विरार : विधानसभेला हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेतून लढलेल्या विजय पाटील यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा शिवसेनेला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कोरोनाची लाट ओसरल्यावर महापालिकेच्या निवडणुका होणार असून त्यापूर्वी सेनेला बसलेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. विजय पाटील यांना पक्ष प्रवेशानंतर पालघर जिल्हाध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. 

मूळचे काँग्रेसचे असलेले विजय पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या समोर उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत विजय पाटील यांना चांगली मतेही मिळाली होती. परंतु त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आणि विजय पाटील हे शिवसेनेपासून दूर जात असल्याचे चित्र याठिकाणी दिसत होते. त्यातच पंधरा दिवसापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे विरार येथे आले असता विजय पाटील यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशावर शिक्का मोर्तब झाले होते आणि आज विजय पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बंगल्यावर रीतसर पक्ष प्रवेश केला. 

पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर पक्षाने पालघर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या पक्ष प्रवेशाच्या वेळी काँग्रेस पार्लेमेंट्री बोर्डाचे सदस्य आणि किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्राग पष्टे, प्रफुल पाटील, योगेश नम, रुबी भुरे, पवन गावीत, संदीप नेने हे उपस्थित होते. विजय पाटील यांना मानणारा ख्रिस्ती आणि मुसलमान समाज हा मोठ्या प्रमाणात असून सेनेबरोबर गेल्याने हा समाज त्यांच्यापासून दुरावला होता. आता महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर विजय पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होईल असे मानले जात आहे. 

मी मूळचा काँग्रेसवाला, सेनेतील वातावरण मला सूट झाले नाही. वसईमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती आणि मुसलमान समाज असून त्यांचे माझ्यावर प्रेम आहे निवडणुकीत हे दोन समाज नाराज झाल्याने त्याचे मला नुकसान झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली होती. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता काँग्रेसच्या नेत्यांनी परत मला काँग्रेसमध्ये घेऊन एक मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे, ती पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन. 
- विजय पाटील
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com