यवतमाळ : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सतत शेतकर्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची जीभ कापणार्यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस तसेच बारा लाखाची गाडी भेट देण्यात येईल. मी त्यांची जीभ कापायला निघालो आहे. तुम्हीही निघा, शेतकर्यांचा अपमान आम्ही सहन करु शकत नाही, अशा शब्दांत यवतमाळ विधानसभेचे संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे.
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य केन्द्रीय राज्य मंत्री, भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केले. या वक्तव्याच्या विरोधात शनिवार (ता.12) स्थानिक दत्त चौकात शिवसैनिकानी आंदोलन करीत निषेध नोदविला.
भाजपाचे सरकार कुठलाही गंभीर विषय समोर आला की बुद्धिभेद करतांना दिसून येते. वेगवेगळया विषयांत गुंतवून नागरीकांची दिशाभूल करण्याचे कार्य भाजपाचे सरकार करीत आहे. आता तर काळया कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतांना त्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले आहे, असे म्हणत शिवसेनेच्या जिल्ह्यातील सर्वच पदाधिकार्यांनी देशभरात वाढत असलेल्या पेट्रोल तसेच डिजल भाववाढीच्या विरोधात संताप व्यक्त केला.
यानंतर शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळला. यावेळी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, किशोर इंगळे, संजय रंगे, सागर पुरी, पिंटू बांगर, मंदा गाडेकर, निर्मला विनकरे, काजल कांबळे, अमोल धोपेकर, संतोष चव्हाण, मनीष लोळगे, रुपेश सरडे, गिरीजानंद कळंबे आदी उपस्थित होते.
वडेट्टीवार यांची कठोर टीका
नागपूर : दिल्लीत शेतकऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन हे चीन आणि पाकिस्तान या देशांकडून पुरस्कृत असल्याच वक्तव्य भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं. देशभर त्याचे पडसाद उमटत आहेत. याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, दानवे भैताड माणूस आहे. एकदम येडपट आहे, असे ते म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले, हा भैताड माणूस राजकारणात कसा काय आला, हेच कळत नाही. बरं आला तर आला, पण भारतीय जनता पक्षाने याला मंत्रीही करून टाकले. ज्याला परिस्थितीचे गांभीर्य नाही, बोलण्याचे भान नाही, अशा माणसाला मंत्री करणे म्हणजे त्या पक्षाच्या विचारधारेवरच प्रश्नचिन्ह आहे. हा माणूस काहीतरी शोध करत असतो. कार्टून माणूस, इब्लीस माणूस जे करतो, नेमके तेच काम हा करत आहे.
आमच्या बच्चू कडूंनी तर म्हटले आहे की, याला घरात घुसून मारले पाहिजे. पण त्याहीपूर्वी याच्या कमरेत डावा मारा किंवा उजवा मारा, एक मारलाच पाहिजे. केव्हा काय बोलावं, याचं भान त्या दानवेला कधी राहिलं आहे का? कीव येते भारतीय जनता पक्षाची की, अशा लोकांना पक्षाचा प्रदेशाध्यक्ष केलं आणि केंद्रात राज्यमंत्री केलं. या पक्षाची काही विचारधारा आहे की नाही आणि असेल तर कुठल्या थराला गेली आहे, याची कल्पना दानवेच्या वक्तव्यावरून येते, असे वडेट्टीवार म्हणाले.

