आर्वीची वैशाली करणार भारत-चीन सीमेवरील रस्त्यांची कामे, ठरली पहिली महिला अधिकारी...

वैशाली लहानपणापासूनच जिद्दी होती. वडील स्व. सुरेशचंद्र हिवसे यांच्यापासून तिने देशसेवेचे धडे घेतले आणि म्हणूनच तिने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या रोड कन्स्ट्रक्‍शन कंपनीची नोकरी स्वीकारली.
Vaishali Hiwase
Vaishali Hiwase

आर्वी (जि. वर्धा) : सिंचन विभागात अभियंता पदावर कार्यरत. चांगली मानाची नोकरी. पण तिचे मन तिथे रमले नाही. कारण देशसेवा करण्याचा ध्यास तिने घेतला होता. ही भावना तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे नोकरी करतानाच युपीएससीची तयारी केली आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये तिची निवड झाली. तेथेही अभियंता, कार्यकारी अभियंता आणि आता थेट कमांडिंग ऑफिसर म्हणून तिची निवड झाली. येथील वेशाली हिवसे हिची ही कहाणी... 

वैशाली हिवसे ही देशातील पहिली महिला कमांडिंग ऑफिसर ठरली. वैशालीच्या नियुक्‍तीने आर्वीकरांची मान अख्ख्या देशात उंचावली. वडील सुरेशचंद्र हिवसे हे येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक तर आई प्रीती हिवसे ही येथील मॉडेल हायस्कूलची शिक्षिका. यांच्या माध्यमातून वैशालीला लहानपणापासून देशसेवेचे धडे मिळाले. वैशालीने येथील मॉडेल हायस्कूलमधून १९९३ ला दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गांधी विद्यालयातून बारावीचे धडे गिरविले. सेवाग्रामच्या बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. एवढ्यावरच ती थांबली नाही, तर नागपूरच्या रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम.टेक.चा अभ्यास केला. सोबतच एमपीएससी व युपीएससीचे धडे घेतले. 

युपीएससीच्या माध्यमातून सीमा सडक संघटन (बीआरओ) सोबत संलग्न असलेल्या रोड कन्स्ट्रक्‍शन कंपनीची (आरसीसी) नोकरी स्वीकारली. पुणे येथे झालेल्या नियुक्तीने तिच्या खडतर कारकिर्दीला सुरुवात झाली. जम्मू, सिक्कीम, लेह भागात दहा वर्ष काम केले. या दरम्यान तिने अभियंता पदावरून कार्यकारी अभियंता पदापर्यंत मजल गाठली होती. वैशालीची जिद्द, काम करण्याची पद्धत आणि वेळेचे नियोजन पाहता बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने तिची कमांडिंग ऑफिसर पदावर नियुक्ती केली असून ती देशातील पहिलीच महिला आहे. 

वैशाली लहानपणापासूनच जिद्दी होती. वडील स्व. सुरेशचंद्र हिवसे यांच्यापासून तिने देशसेवेचे धडे घेतले आणि म्हणूनच तिने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या रोड कन्स्ट्रक्‍शन कंपनीची नोकरी स्वीकारली. तिने आपल्या जिद्द व चिकाटीने वडिलांचीच नव्हे तर परिवाराची इच्छा पूर्ण केली. 
- प्रीती हिवसे 
वैशालीची आई 

काय आहे बीआरओ 
भारताच्या सीमा भागात रस्ते निर्माण करणे, व्यवस्थापन करणे याशिवाय पहाडी भागातील भूस्खलनामुळे मार्गाची हानी होते. तिला दुरुस्त करण्याचे काम सीमा संघटन वर्षभर करते. बीआरओची स्थापना १९६० मध्ये झाली असून यात २ हजार ४६१ अधिकारी व ३९ हजार १७४ कर्मचारी कार्यरत आहेत. 

वैशालीकडे भारत-चीन सीमा रेषेवरील कामाची जबाबदारी 
जम्मू, पुणे, सिक्कीम, लेह सोबतच काही दिवस कारगिलमध्ये जिद्दीने व वेळेचे भान ठेवून केलेल्या कामाची पावती वैशालीला मिळाली असून तिच्याकडे भारत-चीन सीमेवर सुरू असलेले रस्ते निर्माण व इतर कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com