कोरोना संपताच दारूबंदी उठवण्याची वडेट्टीवारांची लगबग - vadettivar is about to lift the ban as soon as the corona ends | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना संपताच दारूबंदी उठवण्याची वडेट्टीवारांची लगबग

प्रमोद काकडे 
गुरुवार, 4 जून 2020

दोन दिवसांपूर्वी महाकाली कॉलरी परिसरात जीवन लाकडे या रामनगर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकावर पाच दारूतस्करांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. यानिमित्ताने दारूतस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

चंद्रपूर : राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठणार, अशी चर्चा सुरू आहे. दारूबंदीच्या नफा-तोट्याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. टाळेबंदीमुळे या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर जाऊ शकला नाही. जिल्ह्यातील दारूबंदी हा विषय थंडबस्त्यात गेला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी एका पोलिस अधिकाऱ्यावर दारूतस्करांनी हल्ला केला आणि दारूबंदी पुन्हा चर्चेत आली. या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे बहुजन कल्याण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "आता खूप झाले. दारूबंदीवर ठोस निर्णय घ्यावाच लागेल', असे सांगत दारूबंदी उठविण्याचे संकेत त्यांनी पुन्हा दिले. 

टाळेबंदी उठल्यानंतर अभ्यास समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडणार आहे, असेही श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. युती शासनाच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील दारूबंदी समाजकारण आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दारूबंदीचा मुद्दा प्रचारात आला. दारूबंदी फसली की यशस्वी झाली, याची चर्चा आजतागायत होत आहे. दरम्यानच्या काळात राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार आले. विजय वडेट्टीवार पालकमंत्री झाले. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात जिल्हा प्रशासनाच्या पहिल्याच बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या ब-यावाईट परिणामांचा करण्यासाठी समिती गठित केली. 

नऊ सदस्यीय या समितीत शासकीय अधिका-यांचा समावेश होता. जिल्ह्यातील नागरिकांनाही आपली मते मांडण्याची संधी देण्यात आली. या समितीकडे दोन लाख 80 हजारांवर अभिप्राय प्राप्त झाले. यातील दोन लाख 61 हजार अभिप्राय दारूबंदी उठवावी, या बाजूने आहेत. या समितीचा अहवाल 24 फेब्रुवारी रोजी आला. तो अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडण्याची तयारी वडेट्टीवारांनी केली होती. याच काळात दारूबंदी उठवणार, असे अप्रत्यक्ष संकेत अनेकदा वडेट्टीवार देत होते. मात्र, तळीराम आणि दारूच्या मधात कोरोनाचे विघ्न आले. कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि सरकारचीच प्राथमिकता बदलली. त्यामुळे हा अहवाल थंडबस्त्यात गेला. लगतच्या जिल्ह्यातून दारूची तस्करी व्हायची. टाळेबंदीत जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. तेथील दारू दुकान बंद झाली. त्यामुळे पुरवठा थांबला. 

याकाळात मोहफुलाच्या दारूची मागणी वाढली. मोहफुलाच्या भट्ट्यांवर टाळेबंदीत पोलिसांनी धाडी टाकल्या. लाखो रुपयांची दारू जप्त केली. टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात देशात जीवनावश्‍यक वस्तूनंतर सर्वांत पहिले दारूचीच दुकाने सरकारने उघडण्याची परवानगी दिली. राज्य सरकारही त्याला अपवाद नव्हते. लगतच्या जिल्ह्यातील दारू दुकाने उघडली गेली. त्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सील असतानाही दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. यातूनच पोलिसांवरील हल्ले वाढले. दोन दिवसांपूर्वी महाकाली कॉलरी परिसरात जीवन लाकडे या रामनगर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकावर पाच दारूतस्करांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. यानिमित्ताने दारूतस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. हा धागा पकडून आता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा आपली जुनीच भूमिका स्पष्ट केली आहे. दारूबंदीवर "ठोस' निर्णय घ्यावाच लागेल, असे सांगून दारूबंदी उठविण्याचे संकेत त्यांनी दिले. टाळेबंदीनंतर अभ्यास समितीचा अहवाल ते मंत्रिमंडळासमोर मांडणार आहेत. 

व्यसनमुक्त करायचे असेल तर दारूबंदी हा उपाय नाही. त्यासाठी प्रबोधन आवश्‍यक आहे. परंतु मतांच्या राजकारणासाठी अंमलबजावणी न होणारे निर्णय घेतले जातात. दारूबंदी झाली. परंतु दारूतस्करी थांबली नाही. पोलिस अधिका-यांवर हल्ले होत आहेत. त्यांचे जीव जात आहेत. लाखो लोकांवर तस्करीचे खटले भरले आहे. दूषित दारू जिल्ह्यात येत आहे. दारूबंदीच्या अंमलबजावणीच्या त्रृटी शोधण्यासाठीच समितीचे गठण करण्यात आले. त्यात लाखो लोकांनी दारूबंदी उठविण्याच्या बाजूने कौल दिला आहे. कडक उपाययोजना कराव्या लागतील. नाहीतर दारूबंदी उठवावी लागेल. यासंदर्भात अधिक बोलण्यापेक्षा ठोस निर्णय भविष्यात घेतला जाईल. 
- विजय वडेट्टीवार, बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री ,चंद्रपूर. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख