लसीकरण केंद्र होताहेत कोरोना प्रसार केंद्र, दिव्यांगांसाठी स्वतंत्र केंद्र उभारा… - vaccination centers becoming corona dissemination centers set up separate centers | Politics Marathi News - Sarkarnama

लसीकरण केंद्र होताहेत कोरोना प्रसार केंद्र, दिव्यांगांसाठी स्वतंत्र केंद्र उभारा…

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

कोरोना पासून बचाव करण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. पुढे तिसरी लाट येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या घटकाला कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचविण्याकरिता त्यांना लवकरात लवकर गैरसोय न होता लस देणे गरजेचे आहे. त्यामुळे  दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांकरिता घरपोच किंवा वेगळे लसीकरणाचे केंद्र उभारा,

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समूह संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. सरकारने लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. तेथे नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्यामुळे ही केंद्रे कोरोनाची प्रसार केंद्र होऊ पाहत आहेत. अशात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी तासनतास थांबावे लागत असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढतो आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारावे किंवा त्यांच्या घरीच लस देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण होत असून मृत्यू होत असलेल्या नागरिकांची देखील संख्या मोठी आहे. कोरोना काळात राज्यात वयोवृद्ध, दिव्यांग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये याकरिता त्यांना घरपोच किंवा वेगळे लसीकरणाचे केंद्र उभारावे, असेही खासदार धानोरकर यांनी म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा तासनतास वाट बघत हजारो लोक लसीकरण केंद्राच्या बाहेर उभे राहत असतात. हे लसीकरण केंद्र जणू कोरोना विषाणूच्या प्रसार होणारे केंद्र आहे कि काय असा प्रश्न अनेकदा निर्माण होत आहे. 

हेही वाचा : covid vaccination : मोहीम राबवायची कशी ?  भाजप शासीत राज्यांनीही हात झटकले...

अनेकदा रांगेत उभे राहून देखील लस उपलब्ध होत नसल्याने निराश होऊन घरी परत जावे लागत आहे. परंतु यात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी गैरसोय होत असते. ते देखील आपला नंबर लागेल या आशेने तासनतास या केंद्राच्या समोर उभे असतात. परंतु त्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. समाजातील हा घटक अतिशय महत्वाचा असून या घटकाकडे या काळात लक्ष देण्याची गरज आहे. कारण या घटकाला मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोना पासून बचाव करण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. पुढे तिसरी लाट येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या घटकाला कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचविण्याकरिता त्यांना लवकरात लवकर गैरसोय न होता लस देणे गरजेचे आहे. त्यामुळे  दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांकरिता घरपोच किंवा वेगळे लसीकरणाचे केंद्र उभारा, अशी जनहितात्मक मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख