महावितरणला बसला तुपकरांचा शॉक, अन् हजारो शेतकऱ्यांचा वीज पुरवठा झाला सुरू... - tupkars shock hits msedcl power supply to thounds of former started | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महावितरणला बसला तुपकरांचा शॉक, अन् हजारो शेतकऱ्यांचा वीज पुरवठा झाला सुरू...

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 15 मार्च 2021

सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, एक मंत्री काय करतो, ते दुसऱ्याला माहिती नाही. अधिकारी काय करतात, तेसुद्धा मंत्र्यांना माहिती होत नाही. त्यामुळे या सरकारमध्ये चाललंय तरी काय ?

नागपूर : महावितरणने कालपासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापायला सुरुवात केली होती. त्यानंतर आज सकाळी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना ही बाब सांगितली. ‘ऑन द स्पॉट रिझल्ट’ देण्यासाठी प्रख्यात असणाऱ्या तुपकरांनी थेट महावितरणचे मुख्य कार्यालय गाठले, अन् महावितरणच्याच कार्यालयाची वीज कापून टाकली. त्याचा परिणामही लवकरच झाला आणि सायंकाळच्या आत हजारो शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत झाला. 

वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी तुपकरांनी आपल्या स्टाईलने आंदोलन सुरू केले. तडक महावितरणचे मुख्य कार्यालय गाठून वीज पुरवठा तोडला आणि अधीक्षक अभियंत्यांना घेराव टाकला. जोपर्यंत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरळीत केला जात नाही, तोपर्यंत कार्यालयाचा वीज पुरवठा सुरू होऊ देणार नाही आणि येथून हटणारही नाही. अभियंत्यांना कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही. आम्ही अंधारात, तर आता तुम्हीही राहा अंधारातच, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून काही तासांतच ६० ट्रान्सफॉर्मरवरून जोडले असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरू केला. 

कार्यालयाचे कामकाज दिवसभर ठप्प
महावितरणच्या मुख्य कार्यालयामध्ये शेकडो कर्मचारी काम करतात. इतिहासात पहिल्यांदा दिवसभर या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित झाला. आज आंदोलन केल्यामुळे वीज पुरवठा सुरू केला. पण उद्या पुन्हा बंद करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर यापेक्षा वेगळे आणि तीव्र आंदोलन करू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी महावितरणला दिला. आजच्या त्यांच्या अभिनव आणि तेवढ्याच आक्रमक आंदोलनामुळे बुलडाणा आणि चिखली तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. 

सरकारमध्ये चाललंय तरी काय ?
एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, वीज कनेक्शन आम्ही कापणार नाही आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणतात की वसुलीसाठी कनेक्शन कापा आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणतात, की शेतकऱ्यांचा वीज पुरवठा आम्ही खंडित होऊ देणार नाही. या सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही, एक मंत्री काय करतो, ते दुसऱ्याला माहिती नाही. अधिकारी काय करतात, तेसुद्धा मंत्र्यांना माहिती होत नाही. त्यामुळे या सरकारमध्ये चाललंय तरी काय, असा प्रश्‍न तुपकर यांनी उपस्थित केला.  
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख