एकाकी पडलेले तुकाराम मुंढे बैठकीतून सर्वात आधी बाहेर पडले...

आपल्या संचालकपदासाठी आयुक्तांनी स्वतःच प्रस्ताव बैठकीत ठेवला. ज्याला संचालक व्हायचं आहे, तो व्यक्ती स्वतःच कसा काय प्रस्ताव मांडू शकतो, असा प्रश्‍न करीत महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांच्या प्रस्तावाला विरोध केला.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या आज झालेल्या बैठकीत सर्व संचालकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना एकाकी पाडले. संचालक असलेल्या अधिकाऱ्यांचाही अप्रत्यक्षपणे मुंढेंना विरोधच होता. अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनीही "तुम्ही संचालक नव्हतेच', असे म्हणत त्यांना जोरदार धक्का दिला. सीईओ पदाचा निर्णय आपल्या बाजुने लागणार नाही, हे आयुक्तांच्या लवकरच लक्षात आले. त्यामुळे एकाकी पडलेले आयुक्त बैठक संपत येताच सर्वात पहीले सभागृहातून बाहेर पडले. 

आजच्या बैठकीत संचालक व शिवसेनेच्या नगरसेवक मंगला गवरे यांनीच फक्त आयुक्तांचे समर्थन केले. पण नियमांनुसार जे योग्य आहे तेच करावे, असेही त्यांनी सुचविले. आपण आयुक्तांची नियुक्ती सीईओ म्हणून केलीच नव्हती, असे स्मार्ट सिटीचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केल्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली. आपल्या संचालकपदासाठी आयुक्तांनी स्वतःच प्रस्ताव बैठकीत ठेवला. ज्याला संचालक व्हायचं आहे, तो व्यक्ती स्वतःच कसा काय प्रस्ताव मांडू शकतो, असा प्रश्‍न करीत महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांच्या प्रस्तावाला विरोध केला. त्यांना इतर सर्व संचालकांनी साथ दिली. अधिकाऱ्यांनीही "एचआर'च्या नियमांत जे बसत असेल, तसेच करावे अशी भूमिका मांडत अप्रत्यक्षपणे का होईना पण मुंढेंना विरोधच केल्याचे बैठकीत उपस्थित एका संचालकाने "सरकारनामा'ला सांगितले. 

सीईओपदी आयुक्तांच्या प्रस्तावावर चेअरमन प्रवीण परदेशी यांनी प्रत्येक संचालकाला विचारणा केली. यात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नासुप्र सभापती शीतल उगले यांचाही समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या एचआर धोरणानुसार सीईओपदी नियुक्ती करावी, असे मत मांडले. विशेष म्हणजे एचआर धोरणात पूर्णवेळ सीईओ नसल्यास डेप्युटी सीईओकडे प्रभार देता येईल, असे स्पष्ट आहे. त्यानंतर महापौर संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे यांनीही पूर्णवेळ सीईओ नियुक्तीपर्यंत डेप्युटी सीईओकडे प्रभार देण्याची मागणी केली. या संपूर्ण बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे एकाकी पडल्याचे दिसून आले. 

केवळ अध्यक्षांसोबतच बोलले आयुक्त 
सर्व संचालक सभागृहात आल्यानंतर बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी सर्व संचालकांनी एकमेकांना नमस्कार, हाय, हॅलो केले. पण आयुक्त कुणासोबतच बोलले नाहीत. त्यामुळे त्यांनाही कुणी नमस्कार वगैरे केला नाही. संपूर्ण बैठकीदरम्यान ते फक्त आणि फक्त अध्यक्ष परदेशी यांच्यासोबतच बोलले, असे सूत्राने सांगितले. सीईओपदाचा निर्णय आपल्या बाजूने लागणार नाही, हे लक्षात आल्याने बैठक संपत येताच ते सभागृहातून निघून गेले. त्याचीही नंतर सभागृहाबाहेर खमंग चर्चा झाली. 

काहीही होवो पण समर्थक लागले कामाला 
बैठकीत आयुक्तांची कोंडी करण्यात आली. त्यांची अपेक्षा असताना सीईओपदी त्यांची नियुक्ती झाली नाही. सर्व आघाड्यांवर मुंढे एकाकी पडले असतानाही बैठक संपताच त्यांचे समर्थक कामाला लागले. सोशल मिडीयावर लोकांनी त्यांचे कौतुक करणे सुरु केले. जनसामान्यांतून त्यांना पाठींबा मिळाला. 

आवाज आजही बुलंद : महापौर जोशी 
पत्रकार परीषद जेव्हा सुरू झाली, तेव्हा वेळेवर माईक बंद होता. भाजयुमोचे काम करत असताना बिना माईकने भाषण ठोकण्याची आपल्याला सवय आहे. माझा आवाज तेव्हाही बुलंद होता आणि आजही आहे, असे महापौर संदीप जोशी मिश्‍कीलपणे म्हणाले. 

Edited By- Yogesh Kute

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com