पक्षाची ‘विकेट’ वाचविण्यासाठी लागणार तिवारींचा कस  

पाच वर्षांसाठी नागरिकांना जे वचन दिले होते, ते पूर्ण करण्याची क्षमता दयाशंकर तिवारी यांच्यात आहे. त्यांना ट्‍वेंटी-२० स्टाईलने काम करण्याची सवय आहे. सर्व नगरसेवक, प्रशासनाला सोबत घेऊन ते जनहिताचे काम करीत उत्कृष्ट ‘कॅप्टन’ ठरतील.
Dayashankar Tiwari
Dayashankar Tiwari

नागपूर : पुढील वर्षी महापालिका निवडणूक होणार आहे. या शेवटच्या वर्षात भाजपने पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना महापौर बनवले आहे. त्यामुळे येत्या महानगपालिकेच्या निवडणुकीत पक्षाची विकेट वाचवण्यासाठी तिवारींचा मोठी कसरत करावी लागणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने कार्यकर्ते काहीसे खचले आहेत. त्यामुळेच की काय भाजपमधील दुफळी पडलेली दिसतेय. या आघाडीवरही त्यांना काम करावे लागेल.  

शेवटच्या वर्षात भाजपने दयाशंकर तिवारी यांच्याकडे महापौरपदाची जबाबदारी दिली. एकप्रकारे संघाला संकटातून काढणाऱ्या ‘नाईटवॉचमन'चीच भूमिका त्यांना बजवावी लागणार असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. रखडलेली विकास कामे, प्रशासनाकडून होणारी अडवणूक, ज्येष्ठ नगरसेवक सहकार्य करीत नसल्याचा पहिल्यांदाच निवडून आलेल्या पक्षातीलच नगरसेवकांचा झालेला समज आदी आघाड्यांवर त्यांचा कस लागणार आहे. तेरा महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी जनतेपुढे जाताना पक्षाची विकेट जाणार नाही, याबाबत त्यांना दक्ष राहावे लागणार आहे.
 
पदवीधर निवडणुकीत पराभवाच्या धक्क्यानंतर भाजपमधील दुफळी समोर आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये निराशेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात वावर असलेल्या दयाशंकर तिवारी यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला. परंतु त्यांच्यापुढे महापौर म्हणून कामे करताना अनेक आव्हाने आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारीपासून तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विकास कामे बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयाची री नवे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ओढली आहे. त्यामुळे कोरोना काळ गेल्यानंतरही अद्याप विकास कामांना निधी नाही. नगरसेवकांना वॉर्ड फंडही मिळत नसल्याने प्रभागातील विकास कामे रखडलेली आहे. 

एवढेच नव्हे साधे सिवेज लाईन दुरुस्ती, रस्ता दुरुस्तीचीही कामे बंद असल्याने नागरिक नगरसेवकांच्या नावाने ओरडत आहे. परिणामी नागरिकांत नगरसेवकांविरुद्ध मते तयार होत असून पुढील मनपा निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापौर म्हणून दयाशंकर तिवारी यांच्याकडे पुढील तेरा महिन्यांचा कालावधी असून यात त्यांना आर्थिक संकटाने रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. एकीकडे राज्य सरकारने अनुदानातही हात आखडता घेतल्याने उत्पन्न व विकास कामांचा मेळ बसविण्यासाठी त्यांचा कस लागणार असल्याचे दिसून येत आहे. 

महापालिकेत नगरसेवक तसेच विविध पदांवर काम करण्याचा त्यांना २० वर्षांचा अनुभव असून त्यांच्या अनुभवाची कसोटी या वर्षात लागणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी अंबाझरी तलावानजीक ७.५ एकर जागेवर स्वामी विवेकानंद यांचे स्मारक व भव्य पुतळा उभारणीसाठी दाखवलेली जिद्द त्यांना वर्षभर दाखवावी लागणार असल्याचे पक्षातील काही नगरसेवकांनी नमुद केले.

भाजयुमोचे अध्यक्ष ते महापौर
दयाशंकर तिवारी बालपणापासून स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. १९८८ मध्ये राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. १९८८-९१ मध्ये भाजयुमोचे शहरअध्यक्ष, १९९२-९४ या काळात भाजप विद्यार्थी मोर्चाचे ते प्रदेश संयोजक होते. १९९५ ते ९७ भाजप शहरमंत्री, १९९७ मध्ये प्रथमच नगरसेवक म्हणून महापालिकेत आगमन, चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. या काळात त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेते म्हणून काम केले. त्यांनी २००४ मध्ये तत्कालीन मंत्री अनिस अहमद यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूकही लढविली. पक्षाने आता त्यांच्यावर महापौरपदाची जबाबदारी दिली. 

विविध क्षेत्रांत वावर 
राजकीय क्षेत्रासह क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा वावर आहे. ते शहर बॉक्सिंग असोसिएशन, शहर आईस स्केटिंग असोसिएशन आणि शहर चेस बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तिवारी नागपुरातील संयोग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून नमकगंज येथील नित्यानंद कन्या विद्यालय व ज्यूनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष आहेत. याशिवाय इतवारीतील नवीन ज्ञानविकास प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष, लोटस कल्चरल अँड स्पोर्टींग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते मानकापूर येथील विश्वंभर शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेद्वारे मतिमंद मुलींची शाळा चालविली जाते. 

पाच वर्षांसाठी नागरिकांना जे वचन दिले होते, ते पूर्ण करण्याची क्षमता दयाशंकर तिवारी यांच्यात आहे. त्यांना ट्‍वेंटी-२० स्टाईलने काम करण्याची सवय आहे. सर्व नगरसेवक, प्रशासनाला सोबत घेऊन ते जनहिताचे काम करीत उत्कृष्ट ‘कॅप्टन’ ठरतील. जनहिताच्या कामाच्या बळावर २०२२ मध्ये पुन्हा जनतेत जाऊन मत मागणार आहोत. अन् जनता पुन्हा आम्हाला सत्तेवर आणेल. 
- प्रवीण दटके, आमदार, शहर भाजपाध्यक्ष.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com