'त्या' तिघांना पहाडावरून खाली येताच नाही आले, अन गेला जीव... - those three people could not come donw from the mountain and life went on | Politics Marathi News - Sarkarnama

'त्या' तिघांना पहाडावरून खाली येताच नाही आले, अन गेला जीव...

अभिजित घोरमारे
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

काल दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग विझवण्याचे काम सुरू होते. अधिकारी, कर्मचारी आणि हंगामी वनमजूर असे एकूण ६० ते ७० लोक होते. दुपारी ४.३० वाजता आग आटोक्यात आली. पण ५ वाजता वाऱ्याचा वेग वाढला आणि त्यामुळे आग वेगाने पसरली. मरण पावलेले तिघे पहाडावर होते.

भंडारा : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या अगदी मधात असलेल्या नागझिरा - पितेझरी या एनएनटीआर वनपरिक्षेत्रामध्ये अज्ञात इसमांनी काल सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लावली. ही आग विझविण्यासाठी गेलेल्या तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोघे गंभीररीत्या भाजले आहेत. 

काल सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कक्ष क्र. ९८, ९९, १००, ९७ येथे आग लागली होती. सदर आग विझविण्याचे काम ५०-६० वन कर्मचारी, अधिकारी व हंगामी मजूर करत होते. काल सायंकाळी ५ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. पण दरम्यान वाऱ्याचा वेग वाढल्याने आग पुन्हा वाढली. विझविण्याचे कार्य सुरू असता कर्मचाऱ्यांना अचानक आगीने वेढले व पहाडी जागा असल्याने वणवा विझवणाऱ्यांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आणि ३ वनमजुरांचा मृत्यू झाला. 

मृतकांमध्ये राकेश युवराज मडावी (वय 40 वर्ष राहणार थाडेझरी), रेखचद गोपीचंद राणे (वय 45 राहणार धानोरी), सचिन अशोक श्रीरंगे (वय 27 राहणार कोसमतोंडी) यांचा समावेश आहे. तर विजय तीजाब मरस्‍कोले (वय 40 वर्ष राहणार थाडेझरी तालुका सडक अर्जुनी) व राजू शामराव सयाम (वय 30 वर्ष राहणार बोरुंदा) हे दोघे गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवलेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

काल दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग विझवण्याचे काम सुरू होते. अधिकारी, कर्मचारी आणि हंगामी वनमजूर असे एकूण ६० ते ७० लोक होते. दुपारी ४.३० वाजता आग आटोक्यात आली. पण ५ वाजता वाऱ्याचा वेग वाढला आणि त्यामुळे आग वेगाने पसरली. मरण पावलेले तिघे पहाडावर होते आणि त्यांना आगीने चहूबाजूने वेढले होते. त्यामुळे त्यांना खाली येता नाही आले. त्यांतील एक जण खाली आला त्याला आम्ही वाचवले. या घटनेनंतर आम्ही जबाबदारी झटकणार नाही. मृतांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, त्यावर आमची चर्चा सुरू असल्याचे नवेगाव बंध नागझिराच्या उपसंचालक पूनम पाटे यांनी सांगितले. 

हेही वाचा : आता मुख्यमंत्र्यांनी ‘माझा व्यवसाय माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबवावा...

कालच्या घटनेत तीन हंगामी मजूर मरण पावले, तर जखमी झालेल्या दोघांना आम्ही नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मरण पावलेले हंगामी मजूर असल्यामुळे शासनाकडून काही मदत मिळेल, असे वाटत नाही. पण आमच्या स्तरावर मदत कशी करता येईल, असा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे उपवनसंरक्षक रामानुजम म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख