they are not bjp workers said nitin bhutada | Sarkarnama

"ते' कार्यकर्ते भाजपचे नाहीत : नितीन भुतडा 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 28 मे 2020

कोणतेही सत्ताधारी रस्त्यावर उतरुन गरजुंना मदत करताना दिसले नाहीत, असा टोला भुतडा यांनी हाणला. "ती' पोस्ट करणाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीशी कुठलाही संबध नसुन ते पक्षाचे कार्यकर्ते नसल्याचा खुलासा त्यांनी केला. 

वणी (जि. यवतमाळ) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. हे कृत्य करणारे भाजपाचे कार्यकर्ते असल्याच्या चर्चा रंगायला लागल्या होत्या. अशातच त्या दोघांचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबध नाही. ते आमचे कार्यकर्ते नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा यांनी दिले. 

वणीतील एका सोशल मिडीया गृपवर आणि फेसबुकवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह छायाचित्र व मजकुर प्रकाशित करण्यात आला होता. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या होत्या. त्या दोघांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले. मात्र या कारवाईने शिवसैनिकांचे समाधान न झाल्याने त्यांनी विवेक पांडे व सतिष पिंपरे यांच्या दुकानातील साहित्याची तोडफोड करुन संताप व्यक्त केला होता. 
राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच या प्रकरणामुळे वणीत शिवसेना व भाजपा असा सामना रंगण्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा यांनी तडकाफडकी वणी गाठली व येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त खुलासा केला. 

कोरोना विषाणूजन्य आजारामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरीकांच्या हाल अपेष्ठा होवू नये, याकरीता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसमावेशक मदत केली. धान्याच्या किटचे वाटप केले आणि वणीपासुन ते उमरखेडपर्यंत प्रत्येक गरजुंना मदतीचा हात दिला. यावेळी कोणतेही सत्ताधारी रस्त्यावर उतरुन गरजुंना मदत करताना दिसले नाहीत, असा टोला त्यांनी हाणला. वणी शहरात शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या तोडफोडीबाबत विचारणा केली असता, "ती' पोस्ट करणाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीशी कुठलाही संबध नसुन ते पक्षाचे कार्यकर्ते नसल्याचा खुलासा भुतडा यांनी करुन अशा आक्षेपार्ह पोस्टचा भाजपा कधीही समर्थन करणार नाही, असे सांगीतले. यावेळी आमदार संजीवरेडडी बोदकुरवार, दिनकर पावडे, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेडे, रवी बेलुरकर, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख