...तर महाराष्ट्रातही यादवी; रविकांत तुपकरांनी दाखवला अनोखा अंदाज ! - then also in Maharashtra there will be war ravikant tupkar showed a unique prediction | Politics Marathi News - Sarkarnama

...तर महाराष्ट्रातही यादवी; रविकांत तुपकरांनी दाखवला अनोखा अंदाज !

विनोद खरे
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही, तर ही देश वाचविण्याची लढाई आहे. यासाठी साहित्यिक, विचारवंत, बुद्धिजीवी, तरुण व समाजातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील मनाच्या व सामाजिक भान जिवंत असणाऱ्या प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

चिखली (जि. बुलडाणा) : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चिखली येथे शहरातील मुख्य भागात असणाऱ्या हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासमोर जागरण गोंधळ आंदोलनाला सुरुवात झाली आहे. स्वतः रविकांत तुपकर यांनी भजन गाऊन आपला अनोखा अंदाज आंदोलनस्थळी दाखवून दिला. 

आंदोलकांनी आंदोलनस्थळीच घरून आणलेल्या ठेचा भाकरीचा आस्वाद घेतला. केंद्र सरकारला जागे करण्यासाठी रात्रभर जागरण - गोंधळ - भजन चालूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 'स्वाभिमानी'चे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कमजोर समजू नये. महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. दिल्लीतील आंदोलनावर सरकारने तोडगा काढला नाही तर राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवू , असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. 

हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही, तर ही देश वाचविण्याची लढाई आहे. यासाठी साहित्यिक, विचारवंत, बुद्धिजीवी, तरुण व समाजातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील मनाच्या व सामाजिक भान जिवंत असणाऱ्या प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे मत तुपकरांनी यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांची ही लढाई केंद्र सरकार पुरती मर्यादित नसून, खरी लढाई अंबानी-अदाणी-मोदी विरुद्ध शेतकरी अशी आहे, असे तुपकर यांनी यावेळी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख