then all doctors in maharashtra will stop working indefinitely | Sarkarnama

...तर महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर अनिश्‍चित काळासाठी काम थांबवतील !

केवल जिवनतारे
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

एक सप्टेंबरपुर्वी झालेल्या बैठकीतील निर्णयावर सरकार ठाम राहिले नाही. तर सरकारने ३१ ऑगस्ट २०२० रोजी नवीन दर जाहीर केले. आयएमएने ४ सप्टेंबर रोजी आणीबाणीच्या राज्य परिषदेच्या बैठकीत शासनाच्या या सूचनेचा निषेध केला आणि शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले.

नागपूर : कोविडच्या काळात खासगी रुग्णालयांचा खर्च वाढला, परंतु उपचाराचे दर सरकारने आकारून दिले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालये चालविणे अवघड झाले आहे. शासनाच्या विरोधात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी यांच्यासोबतच दंतचिकित्सकही एकवटले. या सर्व संघटनांनी आयएमएच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. एकत्र काम करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शासनाने आपला निर्णय मागे न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर अनिश्चितकाळासाठी काम करणे थांबवतील, असा इशारा महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे. 

सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनसह राज्यातील खासगी डॉक्टरांच्या विविध संघटना एकवटल्या आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तर यापुढे शासनानेच सर्व खासगी रुग्णालये चालवावी, असे खडे बोल आयएमएने सुनावले आहे. कोविडच्या संकटामुळे तसेच चुकीच्या धोरणामुळे मध्यम क्षेत्रातील सुमारे अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शासनासोबत झालेल्या पहिल्या बैठकीत अतिदक्षता विभागाचे दर वाढवून देण्यासोबतच बायोमेडिकल वेस्ट तसेच वीज बिलांमध्ये सवलत देण्यात येईल, पीपीईचे दर रोखण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते. 

डॉक्टरांसाठी किट आणि मास्क आणि रुग्णालयांद्वारे वापरल्या जाणाऱ्या मास्क, ऑक्सिजनचे दर केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमी केली जाणार होती. एक सप्टेंबरपुर्वी झालेल्या बैठकीतील या निर्णयावर सरकार ठाम राहिले नाही. तर सरकारने ३१ ऑगस्ट २०२० रोजी नवीन दर जाहीर केले. आयएमएने ४ सप्टेंबर रोजी आणीबाणीच्या राज्य परिषदेच्या बैठकीत शासनाच्या या सूचनेचा निषेध केला आणि शासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले. ९ सप्टेंबरला राज्यातील २१६ आयएमएच्या शाखांमध्ये शहीद डॉक्टरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. 

असे करण्यात आले आंदोलन 
१० सप्टेंबरला आयएमएच्या शाखांतर्फे जिल्हाधिकारी, तालुका अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 
११ सप्टेंबरला आयएमए सदस्यांनी मेडिकल कौन्सिलच्या प्रती जाळत सरकारचा निषेध केला. 
१५ सप्टेंबरला आयएमए सदस्यांमधील रूग्णालय मालकांनी रुग्णालयाच्या नोंदणीच्या प्रती आयएमए शाखेत सादर केल्या.            (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख