supporters of municipal commissioner and commissioner of police crowded on social media | Sarkarnama

सोशल मिडीयावर भिडले मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांचे समर्थक 

राजेश प्रायकर
शुक्रवार, 5 जून 2020

महापालिकेतील विधी समिती सभापती ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी आयुक्तांच्या वक्तव्यावर पत्रकारपरिषद घेतली. माध्यमाच्या एका प्रतिनिधीने या पत्रकारपरिषदेचा व्हीडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला. ऍड. मेश्राम यांनी आयुक्तांना जाब विचारल्याने या पोस्टवर कमेंट करीत चक्क एका मुंढे समर्थकाने ऍड. मेश्राम यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

नागपूर : राजकीय नेत्यांचे समर्थक प्रत्यक्ष आणि सोशल मिडीयावर आपसांत भिडल्याचे आजपर्यंत बघायला मिळत होते. पण आता प्रथमच सोशल मिडियावर दोन अधिकाऱ्यांचे समर्थक आमन-सामने भिडल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला. मात्र, त्याचवेळी त्यांच्या प्रामाणिकपणामुळे दुखावलेले गेलेले त्यांच्या विरोधात उभे ठाकले. त्यांच्या या विरोधकांनी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना कोरोनाच्या उपाययोजनांचे श्रेय देण्यास प्रारंभ केला आहे. 

राज्य सरकारने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून महापालिका आयुक्त मुंढे यांनी कुणाचीही गय न करता कोविड सेंटर असो की नागरिकांना सक्तीने विलगीकरणात पाठविणे असो, सर्व निर्णय धडाडीने घेतले. त्यांनी सोयीस्कररित्या या निर्णयापासून महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना दूरच ठेवले. परिणामी महापालिकेत नगरसेवक, पदाधिकारी आहेत की नाही? अशी शंका निर्माण व्हावी, असे चित्र आहे. 

कोरोनासंदर्भातील उपाययोजना व राजकीय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप धुडकावून लावणे, या वृत्तीमुळे शहरात त्यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग निर्माण झाला. सोशल मिडियावर त्यांच्या कर्तृत्वाचे गुणगाण करताना हा वर्ग दिसतोय. मात्र, त्याचवेळी सर्व निर्णय स्वतःच घेत असल्याने महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांत नाराजी आहे. यातूनच आयुक्तांचे मोठ्या प्रमाणात विरोधकही तयार झाले आहेत. शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी घेतलेल्या निर्णयांचेही कौतुक होत आहे. 

गेल्या अडीच महिन्यांपासून चौक, प्रतिबंधित क्षेत्रात डोळ्यात अंजण घालून पोलिस पहारा देत आहेत. त्यामुळे आयुक्त मुंढे यांच्या विरोधकांनी डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या समर्थनार्थ सोशल मिडियावर पोस्ट टाकण्यास प्रारंभ केला. शहरातील एका दिग्गज नगरसेवकाने त्यांच्या समर्थनार्थ प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व संयमी अधिकारी अशी पोस्ट टाकली. त्यावर शेकडो नेटकऱ्यांनी "कमेंट' केल्या. यात काही मुंढेचे समर्थक तर काहींनी डॉ. उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव केला. आतापर्यंत राजकीय नेत्यांच्या समर्थकांत प्रत्यक्ष तसेच सोशल मिडियावर संघर्ष दिसून आला. आता प्रथमच दोन अधिकाऱ्यांचे समर्थक आमने-सामने आहेत. 

मुंढे समर्थकाची नगरसेवकालाच धमकी 
काही दिवसांपूर्वी महापालिकेतील विधी समिती सभापती ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी आयुक्तांच्या वक्तव्यावर पत्रकारपरिषद घेतली. माध्यमाच्या एका प्रतिनिधीने या पत्रकारपरिषदेचा व्हीडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला. ऍड. मेश्राम यांनी आयुक्तांना जाब विचारल्याने या पोस्टवर कमेंट करीत चक्क एका मुंढे समर्थकाने ऍड. मेश्राम यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख