कडक लॉकडाऊन : चेन कायमच, यंत्रणा ब्रेक...

विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिसत होती. त्याच्यावर कोणाचेच नियंत्रण नव्हते.पोलिसांनी विनाकारण फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात काही मोजके चौक वगळता पोलिसांचा कुठेही बंदोबस्त नव्हता.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर : विदर्भात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नागपुरात आहेत. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या ब्रेक द चेन चा प्रभाव उपराजधानीत दिसेल, असे वाटले होते. पण प्रत्यक्षात मात्र तसे काही झालेच नाही. रस्त्यांवर विनाकारण फिरणारे लोक कायम दिसत होते. वाहतुकही बऱ्यापैकी सुरू होती. शहरात जमावबंदी आणि संचारबंदी असूनही पोलिसांचा धाक कुठेच नव्हता. त्यामुळे ‘चेन कायमच, अन् यंत्रणा ब्रेक’, अशी स्थिती होती. 

कोरोना रुग्णांचा आकडा फुगत चालला असल्याने मुख्यमंत्री लॉकडाउन करायला भाग पाडू नका, असा सातत्याने इशारा देत होते. मात्र कोणीच ऐकत नसल्याने दोन दिवसांपासून त्यांनी दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी संपूर्ण राज्यात जाहीर केली. त्यामुळे आजपासून शहरात शुकशुकाट दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा फारसा प्रभाव शहरात जाणवला नाही. पोलिसांनीसुद्धा विनाकारण अडवणूक होऊ नये, म्हणून थोडी शिथिल भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्याचा फायदा अनेकांनी घेतला. त्यामुळे लॉकडाउनचा परिणाम जाणवला नाही. 

विदर्भात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नागपूरमध्ये असून मृतकांची टक्केवारीसुद्धा इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे. आज कुठल्याही शासकीय आणि खासगी इस्पितळांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये उपचार घेत आहेत. त्याचा वैद्यकीय सुविधेवर ताण आला आहे. महापालिका आणि जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. शहरात ‘जम्बो बेड सेंटर’ सुरू करण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी घरीच राहणे अपेक्षित आहे. मात्र तरुणांचे जत्थे टपऱ्यांवर गठ्ठ्याने बसून होते. 

विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिसत होती. त्याच्यावर कोणाचेच नियंत्रण नव्हते. पोलिसांनी विनाकारण फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात काही मोजके चौक वगळता पोलिसांचा कुठेही बंदोबस्त नव्हता. लॉकडाउनमधून कामगार, अत्यावश्यक सेवा, रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा, शासकीय कर्मचारी, काही खाजही संस्थांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात कडक लॉकडाउन जाणवला नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 

१५ प्रतिष्ठानांवर कारवाई 
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी १५ दुकाने व प्रतिष्ठानांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय पथकाने ५९ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com