कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णांचे शोषण थांबवा : खासदार बाळू धानोरकर    - stop exploiting the patient in the name of corona treatment said balu dhanorkar | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णांचे शोषण थांबवा : खासदार बाळू धानोरकर   

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार व एचआरसीटी स्कॅन टेस्टमधील लूट थांबविण्यासाठी दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करावे. आयसीयू, ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयाचे अधिग्रहण तात्काळ करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य यंत्रणांना दिल्या.

यवतमाळ : जगात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने कहर केला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर देखील भार येत आहे. सध्या वणी व आर्णी विधानसभा मतदारसंघात आरोग्य व्यवस्था कमी पडता कामा नये. त्याकरिता कोरोनाचा उपाययोजनांबाबत कृती आराखडा तयार करा, तसेच रुग्णांना उत्कृष्ट उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहे.  

कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णांचे सुरू असलेले शोषण थांबविण्याची गरज आहे. यवतमाळ जिल्ह्यात केंद्रशासन पुरस्कृत अमृत मेडिकल्समधून कोविड रुग्णांसाठी लागणारे रेमडेसिव्हर, अँटिव्हायर्ल्डरग्स, अँटिबायोटिक्स, टॅबलेट्स तात्काळ मागणीपत्र पाठून साठा मागवावा. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना अत्यल्प दरात औषधी उपलब्ध होतील. त्यासोबतच रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार व एचआरसीटी स्कॅन टेस्टमधील लूट थांबविण्यासाठी दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करावे. आयसीयू, ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयाचे अधिग्रहण तात्काळ करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य यंत्रणांना दिल्या. याबाबत निवेदनाच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे कोविड प्रतिबंधात्मक लस, ऑक्सिजन व रेमडेसिव्हर मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याची विनंती केली. 

त्यासोबतच त्यांनी भ्रमणध्वनीवरून वणी, आर्णी  विधानसभेतील परिस्थितीचा आढावा देखील घेतला. त्यात पांढरकवडा - केळापूर उपविभागामार्फत पांढरकवडा, घाटंजी, आर्णी या भागात ग्रामीण क्षेत्रात देखील लसीकरण केंद्रे सुरू असून आरटीपीसीआर तपासणी सुरू आहे. पांढरकवडा विभागात शहरी व ग्रामीण भागातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७४९ असून बरे झालेले १५४५ रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची मृत्यू संख्या २९ आहे. ग्रामीण व शहरी भागात पांढरकवडा उपविभागात एकूण १३ कंटेनमेंट झोन आतापर्यंत घोषित झाले आहेत. 

हेही वाचा : महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त; गिरीष महाजन बंगालमध्ये व्यस्त!

वणी उपविभागाअंतर्गत वणीसह शिरपूर, कोळगाव, कायर व राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड रुग्णांचे लसीकरण सुरू असून भालर, शिंदोला, घोन्सा, राजूर, चिखलगांव व सावर्ला येथून १४४०७ रुग्णांना लसीकरण करण्यात आले. आरटीपीसीआर तपासण्यादेखील सुरूच आहेत. वणी येथील सुगम हॉस्पिटल आरोग्य विभागाने अधिग्रहीत केले असून यात १६ ऑक्सिजन व ४ आयसीयू बेडची सोय आहे. तसेच ट्रामा केअर येथे नॉर्मल बेड ६० तर ऑक्सिजन चे २० बेडची सोय आहे. मारेगाव येथे ५० बेडची सोय करण्यात आली असून परसोडा येथे १३० बेडची व्यवस्था लवकरच करण्यात येत आहे. वणी उपविभागात एकूण ४६५ कंटेनमेंट झोन असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १८३४ असून बरे झालेले रुग्ण १५११ आहेत. मृत्यूसंख्या २७ असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान थांबविण्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करून टीम वर्क करून रुग्णाची व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख