एमपीएसी परीक्षेतून होणारा भाजपा धार्जिणा प्रचार रोखा : यशोमती ठाकूर - stop bjp fever campaign through mpsc exam said ad yashomati thakur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

एमपीएसी परीक्षेतून होणारा भाजपा धार्जिणा प्रचार रोखा : यशोमती ठाकूर

अरुण जोशी
मंगळवार, 30 मार्च 2021

दरवर्षी लाखो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा देत असतात. मागील परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भात वादग्रस्त प्रश्न सामील करण्यात आले होते. जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रुजविण्यात येत असल्याची टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली. 

मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन ॲड. ठाकूर यांनी याबाबतचे निवेदन दिले. याबाबत त्या म्हणाल्या, एमपीएससी परीक्षेचं संघीकरण करण्यात येत असून परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजपा धार्जिणा राजकीय प्रचार तसेच काँग्रेसविरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निदर्शनास येत आहे. गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख टाळून आवर्जून मोदी सरकार, असा उल्लेख असलेला उतारा प्रश्नपत्रिकेत सामील करण्यात आला होता. तसेच याच प्रश्नपत्रिकेत काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली, असा तथ्यहीन आरोप असलेला उतारा जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आला. यातून काँग्रेसची बदनामी करण्याचा स्पष्ट हेतू दिसून येत आहे. 

दरवर्षी लाखो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा देत असतात. मागील परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भात वादग्रस्त प्रश्न सामील करण्यात आले होते. जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रुजविण्यात येत असल्याची टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. या राजकीयीकरणाला अभ्यासक्रमापासून दूर ठेवण्याची गरज आहे. तसेच अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ॲड. ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विरोधाभास निर्माण करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप मंत्री ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्या निवेदनावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या या मागणीवर भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या विषयामुळे आता नवीनच वाद सुरू तर होणार नाही, असेही बोलले जात आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख