क्रीडामंत्री केदार म्हणाले, कुणालाही पाठीशी घालणार नाही ! - sports minister kedar said i will not support anyone | Politics Marathi News - Sarkarnama

क्रीडामंत्री केदार म्हणाले, कुणालाही पाठीशी घालणार नाही !

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

मानकापूर पोलिसांनी आतापर्यंत अनेक क्रीडा अधिकारी तसेच लाभार्थ्यांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये माजी क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळेसह उपशिक्षणाधिकारी रवींद्र सावंत, त्याचा भाऊ संजय सावंत (दोघेही सांगली) मुख्य सूत्रधार रमेश गाडे, बबन गायकवाड (दोघेही अहमदनगर), अंकुश राठोड व भाऊसाहेब बांगरचा समावेश आहे.

नागपूर : मोठा क्रीडा अधिकारी असो वा बोगस खेळाडू. गैरकृत्य करणाऱ्या कुणालाही मी पाठीशी घालणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. आज दैनिक 'सकाळ'ला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी हा इशारा दिला.

सध्या राज्यभर गाजत असलेल्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केदार म्हणाले, हे प्रकरण निश्चितच गंभीर आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारावर अनेकांनी शासकीय नोकऱ्या लाटल्या. त्यामुळे प्रतिभावान खेळाडूंवर अन्याय झाला आहे, होत आहे. बनावट क्रीडा प्रमाणपत्र बनविणे आणि त्या आधारावर नोकऱ्या मिळविणे हा गंभीर गुन्हा आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकार सहन केला जाणार नाही. या प्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा खणखणीत इशारा क्रीडामंत्र्यांनी यावेळी दिला.

दैनिक 'सकाळ'ने या गंभीर प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत हा घोटाळा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आतापर्यंत अनेक क्रीडा अधिकारी तसेच लाभार्थ्यांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये माजी क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळेसह उपशिक्षणाधिकारी रवींद्र सावंत, त्याचा भाऊ संजय सावंत (दोघेही सांगली) मुख्य सूत्रधार रमेश गाडे, बबन गायकवाड (दोघेही अहमदनगर), अंकुश राठोड व भाऊसाहेब बांगरचा समावेश आहे. पांडुरंग बारगजे, शंकर पंतगे, कृष्णा जायभाये व प्रल्हाद राठोड काही आरोपी अजूनही आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचाही त्वरीत शोध घेण्यात येईल असे मंत्री सुनील केदार आज म्हणाले. 

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख