पोहरादेवीत गर्दी जमवण्यासाठी मंत्र्यांकडून केली होती विशेष व्यवस्था ?

संजय राठोड भूमिगत असताना पुसद येथे त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा तेथे धड १५-२० लोकही जमले नव्हते आणि त्या मोर्चाचा फज्जा उडाला होता. त्यामुळे पोहरादेवीत असे काही होऊ नये, म्हणून आधीच खबरदारी घेण्यात आली होती.
Sanjay Rathod Crowed poharadevi
Sanjay Rathod Crowed poharadevi

नागपूर : १५ दिवसांनंतर जनतेसमोर येताना वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे शक्तिप्रदर्शन करण्याकरिता दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला टार्गेट देऊन लोकांना पोहरादेवी येथे नेण्याबाबत सांगितले होते. पंचायत समितीनुसारही असेच टार्गेट देण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधून २५ ते ३० गाड्या पोहरादेवीला नेण्यात आल्या असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

याशिवाय त्यांच्या इतर समर्थकांनी जमेल तसे आणि जमेल त्या वाहनांनी लोकांना पोहरादेवी येथे नेले. त्यामुळे तेथे एका वेळी येवढी गर्दी झाली. नाही तर कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झाला असताना लोकांनी स्वतःहून येवढा प्रवास करून जाणे सहज शक्य वाटत नाही. दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत. तिन्ही तालुक्यांतील पंचायत समितीसुद्धा शिवसेनेच्याच ताब्यात आहेत. त्याचा पुरेपूर फायदा राठोडांनी शक्तिप्रदर्शनासाठी उचलला असल्याचेही बोलले जात आहे. टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिचा ८ फेब्रुवारी रोजी पुण्यातील मानवाडी परिसरात मृत्यू झाल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. विरोधी पक्ष तर त्यांच्यावर तुटूनच पडला. घटनेनंतर ते १५ दिवस गायब होते. काल बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे ते प्रगटले. एकप्रकारे त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शनच केले. पण येवढे हजारो लोक पोहरादेवीला स्वतःहून गेले की त्यांना नेण्यात आले, याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे. 

काल पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीवरूनही मंत्री संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला जात आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही विरोधी पक्षाकडून जबाबदार धरले जात आहे. २१ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संबंधाने राज्यातील जनतेला आवाहन केले होते आणि एक दिवसानंतर २३ फेब्रुवारीला त्यांच्याच सरकारमधील मंत्र्याने कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत पोहरादेवी या गावात हजारोंची गर्दी जमवली. त्यामुळे मंत्री राठोड कोरोना आणि मुख्यमंत्री या दोघांनाही गांभीर्याने घेत नाहीत की काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे. गर्दी जमवलेल्या १० हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले. पण यामध्ये त्या लोकांचा काही दोष नाही. दोष मंत्री संजय राठोड यांचा आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करायचे असतील तर राठोडांवर करावे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. 

संजय राठोड भूमिगत असताना पुसद येथे त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा तेथे धड १५-२० लोकही जमले नव्हते आणि त्या मोर्चाचा फज्जा उडाला होता. त्यामुळे पोहरादेवीत असे काही होऊ नये, म्हणून आधीच खबरदारी घेण्यात आली असल्याचेही सूत्र सांगतात. त्यामुळेच पोहरादेवीच्या दर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. हे शक्तिप्रदर्शन कशासाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी की सहानुभूती मिळविण्यासाठी, असेही प्रश्‍न समाजातून विचारले जात आहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com