प्रफुल्ल पटेलांची काॅंग्रेसला गुगली... - the speaker of legislative assembly will be present in the three parties meeting | Politics Marathi News - Sarkarnama

प्रफुल्ल पटेलांची काॅंग्रेसला गुगली...

अभिजित घोरमारे
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्याकडे तर खेचणार नाही ना, अशी चर्चा खासदार पटेलांच्या आज केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे. विधानसभेचा अध्यक्ष कॉंग्रेसचाच होईल, असे नाना पटोले गेल्या आठवड्यात भंडारा येथे आले असताना म्हणाले होते.

भंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष कोण होणार, यावर अजूनही कॉंग्रेसच्या गोटात चर्चा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील आमदार संग्राम थोपटे आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. अर्थात विधानसभा अध्यक्षपदावर कॉंग्रेसचाच दावा आहे. पण अध्यक्षपदाची निवड महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या बैठकीत होईल, असे विधान करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संभ्रम निर्माण केल्याचे बोलले जाते. 

विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्याकडे तर खेचणार नाही ना, अशी चर्चा खासदार पटेलांच्या आज केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे. विधानसभेचा अध्यक्ष कॉंग्रेसचाच होईल, असे नाना पटोले गेल्या आठवड्यात भंडारा येथे आले असताना म्हणाले होते. त्यानंतर आज पटेलांच्या वक्तव्यामुळे अध्यक्षपदाबाबत वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पटेल म्हणाले, तिन्ही पक्षांची एक समन्वय समिती आहे. या विषयासाठीही समितीचे सदस्य एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. पण अद्याप तरी तशी बैठक झालेली नाही आणि महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडून तसा प्रस्तावदेखील आलेला नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री शिवसेना आणि कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांना कमी निधी देतात, असा आरोप केला जातो. यावर बोलताना खासदार पटेल म्हणाले की, हा राज्य सरकारचा विषय आहे. याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच देऊ शकतील. तिन्ही पक्षांच्या समन्वयाने सरकारचे कामकाज चाललेले आहे. कुणासोबतही भेदभाव केला जात नाही आणि असे काही असेलही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्यावर उपाय काढले जातील. 

जिल्ह्यांत पटेलांच्या वाऱ्या वाढल्या
राज्यात आता आम्ही ‘मोठा भाऊ’ आहो, असे खासदार प्रफुल्ल पटेल मागे नागपुरात म्हणाले होते. पटेल आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. विदर्भात नेटवर्क वाढविण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची सुरुवात विदर्भातून केली होती. दरम्यान नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भंडारा जिल्ह्यात साकोलीतून शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर मोर्चा काढून आपले इरादे स्पष्ट केले. त्यापूर्वी खासदार पटेल भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत फारसे येत नव्हते. पण या महिन्यात त्यांची ही तिसरी फेरी आहे. नाना पटोलेंमुळेच पटेलांनी जिल्ह्यांच्या फेऱ्या वाढविल्याची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख