... म्हणून पोलिस अधिकारी करत आहेत केवळ दिवस मोजण्याचे काम !

सनदी अधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख असतात, परंतु त्यांच्या बदल्या अगदी बिनधास्तपणे होतात. पोलिस कायदा व सुव्यवस्थेसाठी त्यांना मदत करतात, तरीही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर टाकल्या जात आहेत.
... म्हणून पोलिस अधिकारी करत आहेत केवळ दिवस मोजण्याचे काम !
Police

नागपूर : कोरोनाचे निर्बंध आणि महापुराच्या स्थितीमुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर पडल्या. पण आता बदलीसाठी काहीच दिवसांचा अवधी शिल्लक असल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या कामकाजावर परिणाम होतो आहे. अनेक पोलिस अधिकाऱ्यांचे कामाकडे दुर्लक्ष होत आहे. चार-आठ दिवसांत बदली होणारच आहे, असे गृहीत धरून अनेक पोलिस अधिकारी काम न करता केवळ दिवस मोजत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. Many police officers are just counting the days. 

कोरोना, लॉकडाऊन आणि आता महापुराच्या स्थितीमुळे राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या आणि पदोन्नत्या आणखी लांबल्या आहेत. त्याचे पडसाद राज्यभर उमटत असून पोलिस अधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. अनेक पोलिस अधिकारी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असल्याचे बघायला मिळत आहे. 

विश्‍वसनीय सूत्रानुसार, राज्य पोलिस दलात जवळपास ९५ आयपीएस-एमपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. तसेच १२ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. पोलिस विभागातील साडेपाचशेवर पोलिस अधिकारी बदलीसाठी पात्र आहेत. यामध्ये सर्वच पोलिस अधिकाऱ्यांचा (पीएसआय ते पोलिस अधीक्षक) समावेश आहे. साधारणतः मे-जूनमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. परंतु कोरोनामुळे बदल्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सुरुवातीला १५ टक्के आणि नंतर २५ टक्के बदल्या करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. किमान जुलै महिन्यात तरी सार्वत्रिक बदल्या होतील, असा अंदाज असतानाच पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बदल्या पुढे ढकलल्या. त्यामुळे अनेक पोलिस अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला. 

पुन्हा लांबणार बदल्या !
येत्या ९ ऑगस्टला बदल्यांचा मुहूर्त निघणार आहे. मात्र, तोंडावर असलेला स्वातंत्र्यदिनाचा बंदोबस्त पाहता पुन्हा बदल्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कोरोनाची तिसरी लाट किंवा पूरपरिस्थिती नियंत्रणात न आल्यास पोलिस अधिकाऱ्यांना आणखी वाट बघावी लागण्याची दाट शक्यता आहे. 

व्हॉट्सॲपवर खदखद 
सनदी अधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख असतात, परंतु त्यांच्या बदल्या अगदी बिनधास्तपणे होतात. पोलिस कायदा व सुव्यवस्थेसाठी त्यांना मदत करतात, तरीही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर टाकल्या जात आहेत. अशी खदखद पोलिस अधिकारी व्हॉट्सॲपवर व्यक्त करीत आहेत. अनेक पोलिस अधिकारी तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in