...तर मुख्यमंत्र्यांना सांगेन, की मला बाजुला करा : विजय वडेट्टीवार 

मराठा क्रांती मोर्चाकडून हे राजकारण केले जात आहे. काही शंका असेल तर चर्चा करा. मी काही शेवटचा माणूस नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील ते चर्चा करु शकतात. पण थेट राजीनामा मागणे म्हणजे खालच्या दर्जाचे राजकारण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
Vijay Vadettiwar
Vijay Vadettiwar

नागपूर : "सारथी'च्या माध्यमातून राजकारण केले जात आहे. नको ते बिनबुडाचे आरोप करुन काहीच नसताना प्रकरण निर्माण करुन त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी ओबीसी समाजाचा असल्याने मराठांवर अन्याय करतो, असे म्हणणे सर्वार्थाने चुकीचे आहे. मराठा मुक्ती मोर्चाचा विश्‍वासच नसेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की मला "सारथी'तून बाजुला करा, असे राज्याचे बहुजन कल्याण मंत्री आणि "सारथी'चे प्रमुख विजय वडेट्टीवार आज येथे म्हणाले. 

"सारथी'चे (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) प्रमुख विजय वडेट्टीवार यांच्यावर मराठा क्रांती मोर्चातर्फे विविध आरोप करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता, सारथी बंद करण्याचा कुठलाही विषय नाही. सारथी बंद होणार नाही. या प्रकल्पाला स्वायत्तता देण्याची मागणी करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत त्याचा निर्णय व्हावा, असे आपण सांगितलेले आहे. मी सारथीचा प्रमुख नाही, संचालक म्हणून मला नेमण्यात आले आहे. वित्त मंत्रालयाने प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामधून चे शक्‍य आहे, ते करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही कामे करायची राहून गेली, पण ती कामे आता करणारच आहे. त्यामुळे असले बिनबुडाचे आरोप अजिबात ऐकून घेणार नाही, असे ते म्हणाले. 

50 कोटी रुपयांमधून जी कामे होणे शक्‍य नसेल, त्यासाठी अधिक निधीच्या मागणीसाठी प्रस्ताव पाठवू. कोरोनाच्या संकटामुळे फेलोशीपसह काही गोष्टी मागे पडल्या आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, मी मराठांवर अन्याय करतो. कुठलीही बैठक न घेता, चर्चा न करता थेट माध्यमांसमोर येऊन असे बोलणे म्हणजे विरोधाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्यातच दोन-तीन गट आहेत आणि मराठा क्रांती मोर्चाकडून हे राजकारण केले जात आहे. काही शंका असेल तर चर्चा करा. मी काही शेवटचा माणूस नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील ते चर्चा करु शकतात. पण थेट राजीनामा मागणे म्हणजे खालच्या दर्जाचे राजकारण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

या प्रकल्पाला न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. नियमित बैठका घेतो आणि काम गतिमान ठेवतो. पण मराठा क्रांती मोर्चाने जे आरोप केले आहेत त्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा करणार नाही. त्यांच्या माझ्यावर विश्‍वासच नसेल तर मी यातून बाजुला व्हायला तयार आहे आणि मुख्यमंत्र्यांनादेखील मी हेच सांगणार आहे. मग त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com