शिवसेनेच्या खंडणीबाज कडववर सहावा गुन्हा दाखल 

खंडणीबाज कडव आणि त्याची टोळी शिवसेना पक्षासाठी निधी गोळा करण्याच्या नावावर शहरातील सुपारी व्यापारी, मोठमोठे दुकानदार, सावकार, दारू विक्रेते, बारमालक आणि व्यापाऱ्यांडून महिन्याकाठी लाखोंची खंडणी वसुल करीत होते. यापैकी मोठा वाटा कडव हा घेत होता.
Mangesh Kadao
Mangesh Kadao

नागपूर : शिवसेनेचा निलंबित नागपूर शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव याच्याविरूद्ध आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडवने बजाजनगरातील एका इमारतीत दोन गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवून 25 लाखांनी फसवणूक केली. आतापर्यंत पोलिसांनी मंगेश कडववर खंडणी आणि फसवणूकीचे पाच गुन्हे दाखल केलेले आहेत. आज त्याच्याविरुद्ध सहावा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरोधातील तक्रारींत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारशिवनीचे अजय बाबुराव शेंदरे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीचे त्याच्याविरुद्ध सक्करदरा, हुडकेश्वर, अंबाझरी, बजाजनगर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणूक, खंडणी मागणे, धमकावण्याचे पाच गुन्हे दाखल आहेत. अजय शेंदरे यांना नागपुरात दुकानाकरिता दोन गाळे घ्यायचे होते. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये दोन गाळ्यांच्या विक्रीसाठी शेंदरे यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले. शेंदरेंनी 25 लाख रुपये आरटीजीएसद्वारा त्याला दिले. दोन वर्षांपासून त्याने गाळ्‌यांचे विक्रीपत्र करून दिले नाही किंवा पैसेही परत केले नाही. 

शेवटी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात सहावा गुन्हा दाखल केला. खंडणीबाज मंगेश कडव हा गेल्या आठवडाभरापासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधात पोलीस भंडारा, गडचिरोली व मुंबई येथेही जाऊन आले. पण, सोमवारी त्याची पत्नी डॉ. रुचिता हिला व्हीम्स रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडताच अटक करण्यात आली. ती सध्या कारागृहात आहे. पत्नीला अटक होताच मंगेश आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. गुन्हे शाखा आता पत्नीकडून सर्व "राज' काढून घेतील तसेच पत्नीसुद्धा पोलिसांना सहकार्य करून पितळ उघडे पाडेल, अशी भीती असल्यामुळे मंगेशने पोलिसांसमोर आत्मसर्मण करण्याचे ठरविले होते. 

मंगेशला अटक झाल्यास तो शिवसेनेशी संबंधित आणखी नावे पोलिसांना सांगू शकतो, अशी भीती असल्यामुळे मंगेशची टोळी त्याला सरेंडर करण्यास विरोध करीत होती, अशी माहिती आहे. शेवटी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक किरण चौघुले यांनी कडवला बुधवारी रात्री पांढराबोडी परिसरातून अटक केली. त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यातक आली आहे. त्यानंतर आज पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात त्याच्या भरतनगर येथील घराची व कार्यालयाची झडती घेतली. त्या ठिकाणी जे दस्तावेज सापडले, त्यात कोरे धनादेश, मुद्रांक शुल्क, विक्रीपत्र, करारनामे आदींचा समावेश आहे. या दस्तावेजांची छाननी करून संबंधितांची चौकशी करण्यात येणार आहे. 

खंडणीबाज कडव आणि त्याची टोळी शिवसेना पक्षासाठी निधी गोळा करण्याच्या नावावर शहरातील सुपारी व्यापारी, मोठमोठे दुकानदार, सावकार, दारू विक्रेते, बारमालक आणि व्यापाऱ्यांडून महिन्याकाठी लाखोंची खंडणी वसुल करीत होते. यापैकी मोठा वाटा कडव हा घेत होता. मंगेशने कोट्यवधी रूपयांची प्रॉपर्टी आपले नातेवाईक, भाऊ आणि डॉ. पत्नीच्या नातेवाईकांच्या नावावर केल्याची चर्चा आहे.     (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com