six years of betrayal denomination missed modis consent said atul londhe | Sarkarnama

विश्‍वासघाताची सहा वर्षे - नोटाबंदी चुकलीच, मोदींची मुकसंमती : अतुल लोंढे 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 30 मे 2020

खऱ्या प्रश्‍नांना पाठ दाखवायची आणि जे प्रश्‍नच नाहीत, त्याची चर्चा करायची, असे मोदी सरकारचे काम आहे. आजही खऱ्या प्रश्‍नांना भिडण्याची यांची ताकत नसल्याचा घणाघाती आरोप अतुल लोंढे यांनी केला. दशमुखी रावणाबद्दल लोकांनी ऐकले आहे. टीव्हीवर बघितला देखील आहे. पण हे सरकार म्हणजे सहस्त्रमुखी दानव असल्याची टिका त्यांनी केली. 

नागपूर : मोदी सरकार-2 च्या वर्षपूर्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेसमोर का आले नाही, नोटाबंदी, काळा पैसा यावर का बोलले नाहीत, यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी येथे "चाय पे चर्चा'मध्ये जी आश्‍वासने दिली होती, त्याचे काय झाले, शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव दिला का, असे एक ना अनेक प्रश्‍न मोदी सरकारच्या वर्षपूर्तीला प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी उपस्थित केले. आजच्या दिवशी मोदी जनतेसोबत बोलले नाहीत, म्हणजेच आमची नोटाबंदी चुकली, या विधानाला त्यांनी मुकसंमती दिल्याचे स्पष्ट होते. नोटबंदीची योजना काय होती, हे सांगण्याची हिंमत मोदी आज करत नाहीत, यातच त्याची मुकसंमती दडली असल्याचे ते म्हणाले. 

लोंढे म्हणाले, सहा वर्षांपूर्वी, म्हणजे मोदींची पहीली सरकार येण्यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्‍यातील दाभडी येथे सांगितले होते की, शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव देऊ, पण आज सहा वर्षांनंतर स्थिती काय आहे, हे कोणताही शेतकरी सांगू शकेल. हा मोदींचा जुमला निघाला. आत्ता जे 20 लाख कोटींचे पॅकेज मोदींनी जाहीर केले. हे सुद्धा फसवे आहे. गरीब, शेतकरी, शेतमजुराला यातून काहीच मिळालं नाही. यामध्ये थेट मदत फक्त 1 लाख 86 हजार 500 कोटी रुपयांचीच आहे. जी एकुण जीडीपीच्या .9 टक्के आहे. ही मदत केवळ अपुरीच नाही तर "उंट के मुंह मे जिरा' सारखी आहे. पण हे सुद्धा मोदी सरकारने इमानदारीने केलेले नाही. 

मध्यम वर्ग आणि छोट्या मध्यमवर्गीयांची त्यांनी घोर प्रताडना केली आहे. किसान विकास पत्र, फिक्‍स डीपॉझीट, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या सर्वांचे व्याजदर कमी करुन 44 हजार 750 कोटी रुपये काढून घेतले. सामान्य लोकांचे व्याजाचे पैसे या सरकारने बुडवले. असे करुन 1 लाख 86 हजार 500 कोटी रुपयांमधून 24 टक्के पैसे लोकांकडून काढुनही घेतले. मध्यम आणि लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः सांगितले की, पाच लाख कोटी रुपये देणे आहे. हे पैसे तर दिलेच नाही, पण या उद्योजकांना कर्ज घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जीएसटी लावून घेतल्याचेही सरकारकडून सांगितले जाते. पण जीएसटी अत्यंत चुकीच्या पद्धतीने लावले आहे. त्यामुळे हे सरकार म्हणजे "बुडत्याचा पाय खोलात' अशीच स्थिती असल्याचे श्री लोंढे म्हणाले. 

गेल्या एक वर्षात जनतेने पुन्हा मोदी सरकारवर जो विश्‍वास ठेवला. पण विश्‍वासघात करण्याचंच काम सरकारने केले. प्रत्यक्षात पेट्रोलचे भाव पडल्यानंतरही किंमती का कमी करण्यात आल्या नाहीत. रुपया डॉलरच्या तुलनेत जेव्हा 58 रुपये होता, तेव्हा हे लोक म्हणत होते की "रुपया आयसीयु मध्ये आहे' मग आज 75 रुपये आहे, तर रुपया मेला का, याचेही उत्तर सरकारने द्यावे. आज मोदींकडे जनतेच्या प्रश्‍नांची उत्तरे नाहीत. त्यामुळेच आज त्यांची भाषण देण्याची हिंमत झाली नाही. म्हणूनच आज 56 इंच का सीना "मन की बात'च्या माध्यमातून जनतेसमोर आला नाही. आज रस्त्यांवर जो भारत फिरतो आहे, तो दुःखी आहे, रक्तबंबाळ झाला आहे. 

आज त्यांनी जनतेसमोर येऊन जर सांगितले असते, की आज मी प्रत्येकाच्या खात्यात 10 हजार रुपये टाकतो. पुढचे सहा महीने तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळतील, मनरेगाचे काम 100 दिवसांवरुन वाढवून 200 दिवस करु आणि लघुउद्योगांना कर्ज देण्याऐवजी थेट मदत करु, अशा घोषणा आज मोदींकडून अपेक्षित होत्या. त्या त्यांनी केल्या असत्या तर आम्ही त्यांचे जाहीर कौतुक केले असते आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपण उभे झालो असतो. पण खऱ्या प्रश्‍नांना पाठ दाखवायची आणि जे प्रश्‍नच नाहीत, त्याची चर्चा करायची, असे या सरकारचे काम आहे. आजही खऱ्या प्रश्‍नांना भिडण्याची यांची ताकत नसल्याचा घणाघाती आरोप लोंढे यांनी केला. दशमुखी रावणाबद्दल लोकांनी ऐकले आहे. टीव्हीवर बघितला देखील आहे. पण हे सरकार म्हणजे सहस्त्रमुखी दानव असल्याची टिका त्यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख