रेड्डींच्या अटकेसाठी अमरावतीत शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या आंदोलन सुरू - a sit in agitation started in front of amravati autopasy house for reddis arrest | Politics Marathi News - Sarkarnama

रेड्डींच्या अटकेसाठी अमरावतीत शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या आंदोलन सुरू

अरुण जोशी
शुक्रवार, 26 मार्च 2021

मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्या अटकेसाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून तब्बल तीन तासांपासून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर  ठिय्या आंदोलन सुरू आहे. 

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली काल हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना नागपुरात अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांना अमरावतीला नेले जात आहे. दरम्यान मुख्य वनरक्षक रेड्डी यांनाही याप्रकरणी अटक करावी, या मागणीसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर सामाजिक आणि राजकीय संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 

ठिय्या आंदोलनात भाजपचे नेते सुनील देशमुख, प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, महापौर चेतन गावंडे यांच्यासह काही सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्या अटकेसाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून तब्बल तीन तासांपासून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर  ठिय्या आंदोलन सुरू आहे. 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी काल हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दिपाली चव्हाण यांना उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे. दिपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे. दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले आहे. 

‘माझ्या आत्महत्येस विनोद शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी हीच माझी शेवटची इच्छा आहे,’ असे दिपाली चव्हाण यांनी सूसाईट नोटमध्ये लिहिलं आहे. ‘माझे रोखलेले वेतन माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईला द्या, विनोद शिवकुमार यांच्याबाबत आपल्याकडे खूप तक्रारी आहेत. त्या गांर्भीयाने घ्या’, असे चव्हाण यांनी रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.  'शिवकुमार यांच्याकडे काही जणांनी माझ्याविरोधात तक्रारी केल्या. त्याची शहानिशा न करता शिवकुमार मला निलंबित करण्याची धमकी देत होते. माझ्याकडे तीन गावांच्या पुनर्वसनाचे काम होते. या कामाविषयी माझी बाजू ते ऐकून न घेता ते मला शिवीगाळ करीत होते. मागील आठवड्यापासून ते वारंवार हरिसाल येथे येत आहेत. मला खूप वाईट बोलतात. यांचा मला खूप मानसिक त्रास होत आहे’, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे.   

हेही वाचा : रतन टाटांना दिलासा; सायरस मिस्त्रींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय...

रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि 'लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (वय 28 वर्ष) यांनी काल रात्री हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय निवासात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिपाली चव्हाण या या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत २०१५ मध्ये उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या मूळच्या मराठवाड्यातील रहिवासी होत्या. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागात हरिसाल येथे गेल्या पाच वर्षांपासून त्या कार्यरत होत्या. एक कर्तव्यकुशल व तडफदार अधिकारी असलेल्या दिपाली चव्हाण दोन वर्षांपूर्वीच राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या. राजेश मोहिते हे अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळीचे मूळ रहिवासी असून अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख