वनमंत्री संजय राठोड मंत्रिपदाचा राजीनामा न देण्याची चिन्हे... - signs of forest minister sanjay rathore not resigning | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

वनमंत्री संजय राठोड मंत्रिपदाचा राजीनामा न देण्याची चिन्हे...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

राज्य सरकार राठोड यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसतेय. गेल्या काही दिवसांत राठोड यांच्यावरून सरकारमध्ये आणि शिवसेनेत दोन गट पडल्याचे दिसत होते. पण वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर ती परिस्थिती बदलली आणि आज राठोड परिवारासह पोहरादेवी येथे माध्यमांसमोर आले. त्यामुळे आता ते राजीनामा देणार नाहीत.

नागपूर : बिड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिचा ८ फेब्रुवारीला पुण्यातील वानवाडी परिसरात मृत्यू झाला. त्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले. तेव्हापासून ते गायब होते. १५ दिवसांनंतर आज वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे राठोड पोचले. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यामुळे विरोधक कितीही मागण्या करीत असले तरीही ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत, असे स्पष्ट दिसत आहे. 

घटनेनंतर १५ दिवस उलटल्यानंतरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या प्रकरणात समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये जे दोन व्यक्ती या विषयावर बोलताना आढळले आणि ज्यांना संशयित समजले जात आहे, त्यांची चौकशी कुठपर्यंत आली, हेदेखील कळलेले नाही. त्यामुळे विरोधक या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासह संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी रेटून धरत आहेत. आज संजय राठोडांनी पोहरादेवी येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले. दरेकर म्हणाले, घटनेनंतर राठोड त्यांच्या समाजाचे दैवत असलेल्या पोहरादेवी येथे गेले. त्यामुळे ते तेथे आपल्या चुकांची कबुली देतील आणि समाजबांधवांची माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे वाटले होते. पण असे न करता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आपल्या मंत्र्याला पाठीशी घालत आहे. 

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ता चित्रा वाघ यांनीही राठोडांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या म्हणाल्या, येवढे झाल्यानंतर राठोड समाजबांधवांसमोर आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर पश्चात्ताप व्यक्त करतील, असे वाटले होते. पण आजचे त्यांचे वक्तव्य म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. यवतमाळच्या शासकीय इस्पितळात ट्रिटमेंट कुणावर करण्यात आली, तेथे दाखल करण्यात आलेली मुलगी कोण होती, या प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित होते. पण असे न करता त्यांनी सरसकट सर्व आरोप फेटाळून लावले. उलटपक्षी आरोप केले. त्यामुळे राज्य सरकार त्यांचा राजीनामा मागणार नाही आणि राठोड तो देणार नाही, असं दिसतंय. राठोडांनी आज कितीही शक्तिप्रदर्शन केले असले तरीही भाजप हा विषय लावून धरणार आणि कितीही गुन्हे दाखल केले, तरी आंदोलने करणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. 

पूजा चव्हाण प्रकरणावरून संजय राठोड यांच्या विरोधात विरोधकांकडून गेल्या १५ दिवसांपासून वातावरण तापवले जात आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी आणि राजीनामा मागताना कुठलेही कसर विरोधक ठेवताना दिसत नाही. असे असताना राज्य सरकार राठोड यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे दिसतेय. गेल्या काही दिवसांत राठोड यांच्यावरून सरकारमध्ये आणि शिवसेनेत दोन गट पडल्याचे दिसत होते. पण वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर ती परिस्थिती बदलली आणि आज राठोड परिवारासह पोहरादेवी येथे माध्यमांसमोर आले. त्यामुळे आता ते राजीनामा देणार नाहीत, अशी चिन्ह दिसताहेत.    Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख